चर्चा तर होणारच ! पहिल्याच पावसात लोणावळा शहराची तुंबापुरी; सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत
लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मागील पाच दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी लोणावळा शहरातील बहुतांश रस्त्यांची तुंबापुरी झाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुसळधार कोसळणारा पाऊस, वाढत्या बांधकामामुळे अरुंद होत असलेले नदी नाले व त्यातच नदी नाले योग्य प्रकारे सफाई न झाल्यामुळे लोणावळा शहरात पहिल्याच पावसामध्ये सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.
लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे नांगरगाव येथील आदर्श सोसायटी समोरील नांगरगाव ते भांगरवाडी गेट दरम्यान चा रस्ता पाण्याखाली गेला असून रस्त्यावर किमान एक ते दीड फूट पाणी साचले होते. येथे शेजारूनच इंद्रायणी नदी जात असून ती देखील तुडुंब भरून वाहत असल्यामुळे जाधव कॉलनीमधील काही घरांमध्ये पाणी शिरले. सुरय्या सोसायटीच्या रस्त्यावर पाणी साचले होते. शहाणी हॉलिडे होम समोरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असून अनेक वाहने या ठिकाणी पाण्यात बंद पडत होती. बापदेव मंदिराकडून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग कडे जाणाऱ्या रस्त्यावर दीड ते अडीच फुटापर्यंत पाणी साचले होते. या ठिकाणी वाहन चालकांना मोठी कसरत करून वाहने चालवावी लागली. तुंगार्ली प्रभागातील बद्री विशाल सोसायटीला चारही बाजूने पाण्याचा विळखा बसला असून सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक बंगल्यांमध्ये या ठिकाणी पाणी घुसले. तुंगार्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते तसेच येथील आश्रमा समोर रस्ता देखील पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.
लोणावळा शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर लोणावळा शहर चे नवीन पोलीस स्टेशन ते मावळा पुतळा चौकादरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या ठिकाणी शाळकरी मुलांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करून जाण्याची वेळ आली होती. दरवर्षी या ठिकाणी पाणी साचते मात्र कोणती ठोस उपाय योजना केली जात नाही. केवळ तोंड देखले पणाने कामे होत असल्यामुळे पाणी साचण्याची समस्या कायम आहे. रायवुड भागात ऑक्झिलियम कॉन्व्हेंट शाळेच्या समोर तसेच ट्रायोज मॉल समोरील रस्त्यावर पाणी साचले होते. लोणावळा धरणाच्या मोरी समोर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने हा सर्व रस्ता पाण्याखाली गेला होता. भांगरवाडीतील रस्त्यावर पाणी साचले होते. भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर मराठे पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वर्धमान सोसायटीतील रस्ता पाण्याखाली गेला होता.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी नदी नाले सफाईचे कामे हाती घेतले जाते मात्र ती कामे योग्य प्रकारे झाली आहेत का? याची कोणतीही तपासणी केली जात नाही. रस्त्यांच्या कडेने जी आरसीसी गटारांची कामे झाली आहेत त्यांच्या भिंती या रस्त्यापेक्षा उंच असल्यामुळे रस्त्यावरील पाणी या गटारांमध्ये जात नाही, त्यामुळे देखील रस्त्यांवर पाणी साचत आहे. लोणावळा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. बांधकामे करत असताना नदी नाले वळवले जातात, त्यांची रुंदी कमी केली जाते, त्यामुळे पाणी साचण्याची समस्या ही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. बांधकाम परवानगी दिल्यानंतर नियमाप्रमाणे बांधकाम होत आहे का नाही याची कोणतीही खातरजमा नगर परिषदे कडून केली जात नाही. नगरपरिषदेचा नगररचना विभाग हा केवळ बांधकाम परवाने देणे व पूर्णत्वाचे दाखले देणे एवढेच काम करतो. मात्र बांधकामावर कोणतेही नियंत्रण नगरपरिषदेचे राहिलेले नसल्यामुळे भविष्यामध्ये छोट्या मोठ्या पावसात देखील लोणावळा शहराची तुंबापुरी होऊ शकते. यावर्षी पहिल्याच पावसामध्ये झालेली दैनावस्था, बहुतांश सर्वच रस्ते पाण्याखाली जाणे व अनेक सोसायट्यांना व घरांना पाण्याचा विळखा बसणे ही भविष्यातील धोक्याची घंटा ओळखून नगरपरिषदेने योग्य नियोजन करणे तसेच बांधकाम परवाने दिल्यानंतर बांधकामे नियमाप्रमाणे होतात की नाही, नैसर्गिकरित्या पाणी वाहून जाण्यासाठी योग्य त्या उपाययोजना ठेवण्यात आलेल्या आहेत की नाही याची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी देखील आपापल्या प्रभागांमध्ये होत असलेल्या कामांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
अवघ्या 9 तासात 115 मिमी पाऊस
लोणावळा शहरात आज ९ तासात ११५ मिमी पाऊस झाला. कमी वेळात जास्त पाऊस झाल्यामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली. लोणावळा शहराचा स्ट्रॉम वाॅटर आराखडा तयार करणारी टीम उद्या लोणावळ्यात येऊन पाणी भरलेल्या भागांची पाहणी करणार आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी नगरपरिषदेची टीम सज्ज असल्याचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले.





















