Breaking news

Maval Loksabha Election | मावळ मतदारसंघामधून वंचित कडून माधवी जोशी यांना उमेदवारी

लोणावळा : मावळ लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी करून माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी काल एक्स च्या माध्यमातून जोशी यांच्या नावाची यादी प्रसिध्द केली. जोशी यांच्या उमेदवारी मुळे मावळ लोकसभा निवडणुकीत रंगत येणार असून प्रथमदर्शनी दुरंगी वाटणारी ही निवडणूक आता मात्र तिरंगी होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत देखील वंचित आघाडीने जवळपास पाऊण लाख मते घेतली होती. मावळ लोकसभा मतदार संघात वंचित आघाडीला मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांच्यामुळे महायुतीला धक्का बसणार की महाविकास आघाडीला या मतदानानंतर स्पष्ट होणार आहे.

     माधवी जोशी यांनी मागील दीड ते दोन वर्षापासून मावळ लोकसभा मतदार संघात इच्छुक म्हणून तयारी दाखवली होती. मतदार संघात त्यांनी अनेक वेळा मोठ मोठे फलक लावत त्यांचा चेहरा जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. महायुती चे उमेदवार श्रीरंग बारणे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे दोघेही पिंपरी चिंचवड भागातील म्हणजेच घाटा वरील आहेत. तर वंचीतच्या माधवी जोशी ह्या घाटा खालील उमेदवार असल्याने त्यांना निश्चितच घाटा खालून चांगले मताधिक्य मिळणार आहे. यामुळे मावळ लोकसभेची लढत आता तिरंगी होणार आहे. सोमवारी श्रीरंग बारणे ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मंगळवारी संजोग वाघेरे अर्ज दाखल करणार आहे. माधवी जोशी यांनी मात्र उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार हे अद्याप जाहीर केलेले नाही.





इतर बातम्या