लोणावळा शहरातील अनधिकृत फ्लेक्स वर लोणावळा नगरपरिषदेची कारवाई; 113 फ्लेक्स काढले
लोणावळा : लोणावळा शहरात दिवाळीमध्ये नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता रस्त्याच्या दुतर्फा तसेच विजेच्या खांबांवर लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स लोणावळा नगर परिषदेने कारवाई करत आज हटवले आहेत. कुमार चौक ते भांगरवाडी दरम्यान जवळपास 113 लहान मोठे फ्लेक्स काढण्यात आले आहेत.
लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, अतिक्रमण प्रमुख रोहन डोणे यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार अतिक्रमण पथक प्रमुख विजय साळवे व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.
लोणावळा शहरामध्ये सातत्याने विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरात फ्लेक्स बॅनर लावले जातात. हे बॅनर लावत असताना नगरपरिषदेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. अनधिकृतपणे व मनमानीपणाने कोठेही हे फ्लेक्स लावले जात आहेत. गणपती सणापासून ते दिवाळीपर्यंत अशा या फ्लेक्सची लोणावळा शहरात गर्दी झाली होती. अखेर दिवाळी सणाच्या नंतर लोणावळा नगरपरिषदेने हे शुभेच्छा फ्लेक्स बॅनर व इतर जाहिरातींचे बॅनर हे हटवले आहेत. खरंतर वर्षातून एकदा किंवा दोनदा अशा कारवाया न करता सातत्याने ह्या कारवाया होणे गरजेचे आहे.
शहराच्या विद्रफीकरणाला हे फ्लेक्स मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. कुठेही कसे पद्धतीने फ्लेक्स लावले जातात. लोणावळा नगर परिषदेने जाहिरात फ्लेक्स लावण्यासाठी विशिष्ट प्रकारचे झोन विभागवार तयार करावेत असे देखील मागणी पुढे येत आहे. केवळ बाजारभागातच नाही तर सर्वच प्रभागांमध्ये महत्त्वाचे चौक व रस्त्यांवर असे फ्लेक्स सर्वत्र लावले जात आहेत. विविध कार्यक्रमांची माहिती तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स यांची संख्या मागील काही काळामध्ये झपाट्याने वाढली आहे. लोणावळा नगरपरिषदेने केलेली कारवाई ही स्वागतार्ह असली तरी त्यात सातत्य राहणे गरजेचे असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.


















