Lonavala Rain Information l लोणावळा शहरात सोमवारी दिवसभरात 275 मिमी पाऊस; तर 24 तासात 727 मिमी पावसाची विक्रमी नोंद
लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मागील 72 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांमध्ये तब्बल 275 किलोमीटर पाऊस झाला तर रविवारी सायंकाळी पाच ते सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 24 तासात तब्बल 727 मिमी (28.62 इंच) इतका विक्रमी पाऊस लोणावळा शहरांमध्ये झाला आहे. लोणावळा शहरामध्ये आजपर्यंत झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहराचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.
लोणावळा शहरालगत असलेले लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या भिंतीवरून लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाली. या पाण्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीचे पाणी हे लोणावळा बाजारपेठ, हुडको कॉलनी, दामोदर काॅलनी, नांगरगाव येथील सोसायट्यांच्या भागामध्ये भरण्यास सकाळपासून सुरुवात झाली. हुडको कॉलनी या ठिकाणी साधारणता आठ ते दहा फूट पाणी झाले होते. अनेक घरांचे पहिले मजले पाण्याखाली गेले तर बैठ्या घरांच्या पत्रांना पाणी लागले होते. या ठिकाणच्या नागरिकांना रोपच्या व बोटींच्या च्या साह्याने बाहेर काढण्यात आले. इंद्रायणी नगर, कैलास नगर, महाडा कॉलनी, दामोदर कॉलनी, सुरय्या सोसायटी, आदर्श कॉलनी, जाधव कॉलनी, नक्षत्र सोसायटी, वृंदावन सोसायटी, निशिगंधा सोसायटी, डेनकर कॉलनी या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. घरातील साहित्य दारासमोर उभी असलेली वाहने विद्युत उपकरणे यांचे देखील पाण्यामुळे नुकसान झाले आहे.
सायंकाळी पाच नंतर पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे मात्र जोराचा वारा हा सुरूच आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास पाणी वाहून जाण्यास व पूर परिस्थिती निवडण्यास मदत होणार आहे. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल होणार आहे. लोणावळा शहरामध्ये मागील अनेक वर्षानंतर 24 तासांमध्ये एवढा विक्रमी पाऊस झाला आहे. कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे लोणावळा शहरामध्ये ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सात जुलै रोजी लोणावळा शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.





















