लोणावळा नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण संकुलाची दुरावस्था; स्लॅबचा काही भाग पाडून एक जण गंभीर जखमी
लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाची दुरावस्था झाली असून इमारत धोकादायक स्थितीत आली आहे. सोमवारी 12 ऑक्टोबर रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या काही भाग जिन्याजवळ कोसळून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर मुंबई येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती येथील गाळेधारकांनी दिली.
लोणावळा नगर परिषदेच्या हॉस्पिटल लगत यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल आहे. तळमजल्यावर दुकाने व वरील मजल्यावर विविध कार्यालय आहेत. या ठिकाणी महत्त्वाचे दुय्यम निबंधक कार्यालय असल्यामुळे अनेक वकील यांची कार्यालय देखील आहेत तसेच काही पतसंस्था देखील या इमारतीमध्ये आहेत. सातत्याने या ठिकाणी नागरिकांचा राबता असतो वेगवेगळ्या कामासाठी नागरिक या ठिकाणी येत असतात. सोमवारी देखील असेच एका कामानिमित्त मुंबई भागातील एक व्यक्ती या इमारतीमध्ये आली होती. त्यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग त्यांच्या अंगावर कोसळल्यामुळे ते जखमी झाले त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत अशी माहिती ॲड. दीपक चौधरी यांनी दिली.
इमारतीच्या या दुरावस्थेबाबत येथील गाळेधारकांनी अनेक वेळा लोणावळा नगर परिषदेला कळवले आहे. इमारत जीर्ण झाली आहे अनेक गाड्यांमधील स्लॅब चे काही भाग पडत आहेत तसेच जिन्याच्या भागामध्ये व मोकळ्या पॅसेज मध्ये देखील काही ठिकाणी स्लॅब चे भाग पडून लोखंड दिसू लागले आहे. नगरपरिषदेला वारंवार याबाबत माहिती देऊन व सूचना देऊन देखील कोणतीही दखल या ठिकाणी घेतली गेलेली नाही. त्यामुळेच कालची ही दुर्घटना घडली आहे. लोणावळा नगरपरिषदेने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
शहरातील खाजगी मालमत्ता जीर्ण झाल्यानंतर त्या धोकादायक म्हणून घोषित केल्या जातात मात्र लोणावळा नगर परिषदेची स्वतःची व्यापारी संकुल इमारत जीर्ण झालेली असताना तिची कोणतीही सुरक्षा ऑडिट झालेली नाही व नागरिकांच्या समस्या व तक्रारीनंतर देखील त्याची दखल घेतली गेलेली नाही असे येथील नागरिकांनी सांगितले.
















