Breaking news

चर्चा तर होणारच ! भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले; शासनाचा ६ कोटींचा निधी माघारी: जबाबदार कोण?

लोणावळा : लोणावळा शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला ६ कोटी रुपयांचा निधी काम बंद असल्यामुळे वापरला न गेल्याने शासनाकडे पुन्हा माघारी गेला आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर झालेला हा अक्षम्य हलगर्जीपणा पाहता, याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल लोणावळावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

भूमिपूजन २०१९ चे, वर्ष २०२६ संपत आले तरी काम अपूर्ण

भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन २०१९ साली मोठ्या दिमाखात पार पडले होते. हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु २०२६ वर्ष संपत आले तरी पुलाचे काम अद्याप अपूर्णच अवस्थेत आहे. शासनाकडून एवढा मोठा निधी उपलब्ध होऊनही त्याचा योग्य वेळी विनियोग न झाल्यामुळे तो शासन दरबारी जमा झाला आहे. तांत्रिक बाबी इतकी वर्षे रेंगाळत ठेवण्यामागे लोणावळा नगर परिषदेचा नेमका हेतू काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

प्रशासन आणि नगरपरिषदेचा अनास्था कारभार

रेल्वे प्रशासनाने आपल्या हद्दीतील रेल्वे लाईन्सवरील पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र, उर्वरित रखडलेले काम लोणावळा नगरपरिषदेच्या अखत्यारित येते. भांगरवाडी भागातील जागेचा प्रश्न मार्गी लागलेला असतानाही काम रखडलेले आहे. दुसरीकडे, कंत्राटदाराचे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांनीही काम बंद ठेवल्याची चर्चा आहे. तसेच, नांगरगाव भागातील जागेची समस्या अजूनही सुटलेली नाही. वारंवार आंदोलने आणि निवेदने देऊनही लोणावळा नगरपरिषदेने या महत्त्वाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते.

नागरिकांना दैनंदिन सहन करावा लागतो त्रास

भांगरवाडी रेल्वे गेटवर तासनतास गेट बंद राहत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुले, नोकरवर्ग, कामगार आणि प्रवाशांना दररोज या मनस्तापला सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेकडून केवळ लवकरच काम पूर्ण होईल अशी खोटी आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती होत नसल्याचे दिसून येते.

आता निधी मिळवण्यासाठी नगरपरिषदेला करावा लागणार पाठपुरावा

शासनाचा निधी माघारी गेल्यामुळे आता तो पुन्हा मिळवण्यासाठी नगरपरिषदेला नव्याने पाठपुरावा करावा लागणार आहे, अथवा नगरपरिषदेच्या स्वनिधीतून हे रखडलेले काम पूर्ण करावे लागणार आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याबाबत लोणावळा नगर परिषदेला कोणतेही स्वारस्य नसल्याचे यावरून अधोरेखित होते. नगरपरिषदेने सर्वसामान्य नागरिकांच्या सहनशीलतेचा आणखी अंत पाहू नये, अन्यथा तीव्र जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा नागरिकांनी दिला आहे.

भांगरवाडी भागातील काम सुरू करण्याबाबत ठेकेदाराला सूचना

भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम तांत्रिक अडचणीमुळे रखडले हे खरे असले तरी भांगरवाडी भागातील जागेचा प्रश्न मार्गी लागला असून तेथील काम सुरू करण्याबाबत ठेकेदाराला सूचना करण्यात आल्या आहेत. नांगरगाव भागातील जागेचा विषय हा सक्तीचे भूसंपादन मधून सोडवला जात असून तो देखील लवकरच मार्गी लागेल असे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले. शासनाकडे माघारी गेलेल्या निधीबाबत पत्र व्यवहार झाला असून तो निधी देखील लवकरच नगर परिषदेकडे वर्ग होईल असे देखील श्री. साबळे यांनी सांगितले.

इतर बातम्या