Breaking news

भारत हा जगातील सर्वात जास्त मांजर पालन करणारा देश - साकीब पठाण

Lonavala - www.mavalmaza.com 

खोपोली (प्रतिनिधी) : हल्ली मांजर पाळणाऱ्यांची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे किंबहुना मांजर पालन क्षेत्रात भारत हा जगात अव्वल ठरत आहे. उंदरांचा खात्मा करण्यासाठी मांजर पाळणे हा उद्देश मागे पडला असून हल्ली मांजर पालन हा प्रेस्टीजचा विषय झाला आहे. कोविड काळात जनजीवन ठप्प झालेले असताना पाळीव प्राण्यांसोबत आपल्या भावना व्यक्त करणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली, त्यात मांजर हा आर्थिक दृष्ट्या परवडणारा प्राणी असल्याने अनेकांनी तो पर्याय निवडला होता असे प्रतिपादन फीलाईन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष (Feline club of India) साकीब पठाण यांनी खोपोली येथे केले.    

         मांजर हा प्राणी मुलत: आफ्रिकेतला आहे. त्याची उत्पत्ती ही वाळवंटातली असल्याने तो कमी पाण्यावर जगणारा मात्र पुर्णतः मांसाहारी असतो. त्यामूळे त्याच्यावर शाकाहार लादणे अन्यायकारक असल्याचे मत श्री कृपा एक्वेरियम खोपोली (Khopoli) आणि हेल्प फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या सभागृहात मोठया संख्येने उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पठाण यांनी व्यक्त केले. मांजर हा प्राणी जेवढा पाळीव म्हणून प्राणी मित्रांना आवडू लागला आहे तेवढाच तो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नवा आणि पूरक पर्याय म्हणून पूढे येत असल्याचे सांगताना मांजरांच्या अंगभूत असलेल्या सवयींच्या अनुषंगाने जर पालन पोषण झाले तर वेगळा आनंद आणि समाधान प्राप्त होईल असा सल्ला यावेळी त्यांनी मांजर प्रेमींना दिला. जेष्ठ पशूवैद्य डॉ. राहुल मुळेकर यांनी मांजरांचे लसीकरण, विविध आजार, संगोपन आणि उपचारा संदर्भात मार्गदर्शन केले. 

     रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. सावित्री रघुपती, श्री कृपा एक्वेरियमचे संचालक प्रवीण शेंद्रे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, रोटरी क्लबचे मिलिंद बोधणकर, प्राणीमित्र सुफियान शेख इत्यादी मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. साजिद खान, रशीद खान, गौरव वारिया, अल्ताफ पटेल, राहुल गायकर हे प्राणी मित्र तसेच अस्मित पाटील, करण सुटे, अक्षय जाधव, राज पाटील, इत्यादी मांजरांचे पैदास करणारे ब्रिडर यांनी या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. रोझारी टॉप टेल, नेस्ले पुरीना, Drools, सिग्नेचर इत्यादी मांजरांसाठी खाद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी या सेमिनारमध्ये सहभाग नोंदावला होता. या निमीत्ताने मांजर प्रेमींना एक अनोखी पर्वणी लाभल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली गेली.

इतर बातम्या