Breaking News l मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी आठ ते नऊ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक अतिशय संत गतीने सुरू असून अमृतांजन फुल ते खालापूर टोल नाका अशा साधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या दिशेने जाणारी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना खंडाळा बोगद्याजवळ थांबवत सर्व सहा लेन या पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी काही वेळेचा ब्लॉक घेत सोडण्यात येत आहेत. तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहने ही लोणावळा एक्झिट या ठिकाणी थांबवण्यात आली आहेत.
शनिवार रविवारच्या सुट्टया असल्याने या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक खाजगी वाहनांमधून घराबाहेर पडले आहेत. त्यातच रेल्वेच्या देखील ब्लॉकमुळे काही गाड्या बंद असल्याने त्याचा अतिरिक्त ताण हा रोड वाहतुकीवर आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटुंबांसह व मुलांसह थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा यासह कोल्हापूर, नाशिक या भागांमध्ये पर्यटनासाठी जात आहेत. तसेच कोकण किनारपट्टीला जाणारे अनेक पर्यटक हे कराड व कोल्हापूर मार्गे जात असल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या संख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे आज पहाटेपासुनच मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडीमुळे झाली आहे.