Breaking news

कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत गोरगरिबांना मदतीचा हात देणार्‍या पोलीस निरीक्षक मुजावर यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

लोणावळा : कोरोना संकट काळात कायदा व सुव्यवस्था राखत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील जास्तीत जास्त गावे कोरोनामुक्त राखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारे व पोलीस ठाणे हद्दीतील गोरगरिब नागरिकांना वाड्या वस्त्यांवर जाऊन अन्नधान्य किट वाटप करून मदतीचा हात देणारे लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांना नुकतेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमिताब गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आदी उपस्थित होते. पुण्यामध्ये हा सन्मान सोहळा पार पडला.

    सहा महिन्यांपुर्वी लोणावळा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक पदाची धूरा हातात घेतलेले पोलीस निरीक्षक मुजावर यांनी ग्रामपंचायत सरपंच निवडणूकीत कामाची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे हद्दीत लपूनछपून सुरू असलेले अवैध धंदे यांच्यावर कठोर कारवाया केल्या. अनेक गुन्ह्यांची तात्काळ उकल केली. तर बाहेर गुन्हे करून हद्दीत आश्रयासाठी आलेल्या सराईतांना जेरबंद केले. नियम मोडणार्‍य‍ांवर कायद्याचा बडगा उचलत कोरोना काळापासून आजपर्यंत नियम मोडणार्‍या 1500 हून अधिक जणांवर कारवाई करत 10 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला तर वारंवार नियम मोडणार्‍य‍ांवर गुन्हे देखील दाखल केले. पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी, याकरिता मुजावर हे स्वतः रात्रगस्त असो वा दिवस बंदोबस्त जातीने हजर राहून कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावत आहेत. तसेच कोरोनामुळे अनेक‍ांचे रोजगार गेल्याने हातावर पोट असणार्‍या आदिवासी व इतर समाजातील नागरिकांची होणारी परवड पाहून, त्यांना मदतीचा हात देत स्वतः वाड्या पाड्यांवर जाऊन त्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्यांचे किट वाटप केले. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

इतर बातम्या