Breaking news

Lonavala News : कुसगाव टोलनाक्यावर टोलच्या नावाखाली अवजड वाहनचालकांची लुट - मी लोणावळेकर

लोणावळा : सोमाटणे टोलनाक्याप्रमाणेच मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या आंतर वळणाजवळ वलवण गावाच्या हद्दीत कुसगाव टोलनाका अनाधिकृतपणे उभारत याठिकाणी चुकीच्या पद्धतीने वाहनांकडून दोनदा टोल वसुली केली जात आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरसोली टोल नाका येथे टोल भरल्यानंतर मुंबईकडे जाणारी अवजड वाहने ही लोणावळा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर प्रवेश बंदी असल्याने वलवण येथून एक्सप्रेस वे वर जातात. मात्र एक्सप्रेस वेळेवर प्रवेश करताच या वाहनांकडून पुन्हा नव्याने टोल वसुली केली जाते. 

      2020 - 21 सालापर्यंत वरसोली टोलनाक्यावरील टोल भरण्याची पावती कुसगाव टोलनाक्यावर ग्राह्य धरत वाहनांना एकच टोल पावती आकारली जात होती. आता मात्र दोन वेळा टोल वसुली केली जात असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी लोणावळा शहरातून अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातलेली असताना देखील केवळ या टोलच्या झोलमुळे त्रस्त झालेले वाहन चालक लोणावळा शहरांमधून धोकादायक पद्धतीने वाहने घेऊन जात आहेत. यामुळे लोणावळा शहरात सातत्याने स्थानिक नागरिकांचे प्राणांतिक अपघात होत आहेत. सदरचे प्रकार रोखण्यासाठी कुसगाव टोल नाक्यावर पूर्वीप्रमाणे वरसोली टोलनाक्यावरील टोलची पावती ग्राह्य धरली जावी. अन्यथा सदरचा टोलनाका हा कुसगाव हद्दीमध्ये जेथे त्याचे नोटिफिकेशन झाले आहे त्या ठिकाणी हालविण्यात यावा अशी मागणी मी लोणावळाकर यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

       लोणावळाकर नागरिकांनी या मागणीसाठी मागील वर्षी आंदोलन पुकारत रास्ता रोको केला होता. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन देत एमएसआरडीसी व आयआरबी यांनी लोणावळाकरांच्या तोंडाला पाने पुसली होती. मनशक्ती केंद्र ते खंडाळा बॅटरी हिल दरम्यान मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. या भागात कोठेही साईडपट्टी अस्तित्वात नाही. नाझर काॅर्नर खंडाळा येथील ब्लॅक स्पाॅट काढण्यासाठी वळणे काढत रस्ता सरळ करण्याचे आश्वासन एमएसआरडीसी व आयआरबी ने वर्षभरापूर्वी दिले होते. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही झालेली नाही. लोणावळा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग मर्यादित रहावा याकरिता पाच ठिकाणी नियमानुसार स्पिडब्रेकर लावण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जागोजागी ब्लिंकर दिवे लावण्याचे ठरलेले असताना ते देखील लावले गेलेले नाहीत. दुभाजक देखील अर्धवट लावले आहेत. खंडाळा मार्गे वन वे मधून विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक बंद केली गेली नाही. जिल्हाधिकारी पुणे यांनी सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान लोणावळा व खंडाळा शहरातून अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातलेली असताना सर्रास वाहने शहरातून जात आहेत. आज सकाळी देखील एका कंटेनरच्या धडकेत दुचाकी चालक व एक शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. एमएसआरडीसी व आयआरबी यांनी लोणावळाकर नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची तात्काळ पुर्तता करावी अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

इतर बातम्या