Breaking news

Lonavala News : सामाजिक दायित्व निधीच्या (CSR) मदतीने शैक्षणिक संस्था विकसित होतील : रमेश नय्यर

लोणावळा : शिक्षण संस्थांना आर्थिक अडचणी भासतात, त्या दूर करून दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी औद्योगिक परिसरातील कारखानदारांनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (CSR) मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्यासाठी संस्था चालकांनी प्रयत्न करावे असे आवाहन लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेश नय्यर यांनी केले. 

     लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने मावळ तालुक्यातील शिक्षण संस्था चालकांचा मेळावा लोणावळ्यातील गोविंदा रिसॉर्ट या ठिकाणी आयोजित केला होता. त्या ठिकाणी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाचालक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय कोलते होते. मेळाव्यामध्ये संस्था चालकांनी शिक्षक व शिक्षकेतरांच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात अशी मागणी केली. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अंदाजपत्रकात तुटपुंजी तरतूद केल्याबद्दलची खंत संघटनेचे तालुका संचालक दत्तात्रय पाळेकर यांनी व्यक्त केली. संस्थाचालकांनी अतिशय गांभीर्याने विद्यार्थी गुणवत्ता वाढीचा विचार करावा असे आवाहन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव यांनी यावेळी केले. 

      मावळ तालुक्यातील संस्थाचालकांनी शिक्षण संस्थाचालक शिक्षण मंडळाचे सभासद व्हावे असे आवाहन अध्यक्ष विजय कोलते यांनी केले. सचिव शिवाजी घोगरे यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीला मावळ तालुक्याचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, तुकाराम आसवले, मारुती देशमुख, ॲड. नीलिमा खिरे, आप्पासाहेब बालवडकर, वि.ल. पाटील, शिवाजी चाळक, नंदकुमार वाळुंज, बंडोबा मालपोरे, दत्तात्रेय येवले, शांताराम पोमण आदि मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यातील उपस्थितांचे आभार निर्मला जाधव यांनी मानले.

इतर बातम्या