Breaking news

Maval Political Report : आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलोय ही भावना मनात ठेवू नका; महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकमेकावर टीका करणारे नेते आले एकाच व्यासपीठावर

मावळ माझा न्युज नेटवर्क : आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलोय ही भावना कोणी मनात ठेवू नका, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी जे झालं ते विसरून जा, असे म्हणत मागील चार वर्ष एकमेकावर जोरदार टीका करणारे व खासदार श्रीरंग बारणे यांनी दहा वर्षात मावळात काय विकास कामे केली याचा हिशोब मागणारी मावळातील नेते मंडळी काल महायुतीच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एकत्र आली होती. त्यामुळे ह्यांच्यावर आता किती विश्वास ठेवायचा याबाबत मतदार व मावळातील नागरिक संभ्रमात आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही एकमेकाच्या सोबत विरोध घेतला ते सर्व आता विकासाच्या नावाखाली एकच व्यासपीठावर बसल्याने कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. त्यामुळे नेते एक बाजूला व जनता दुसऱ्या बाजूला अशीच काहीशी स्थिती मावळात निर्माण झाली आहे. 

     मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरीता मावळातील राष्ट्रवादी आग्रही होती, त्याच पद्धतीने मावळची जागा भाजपला मिळावी यासाठी भाजपा देखील आग्रही होती. दोन्ही पक्षांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्यप्रणालीवर जोरदार टीका केली होती. मात्र महायुतीमध्ये ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा लोकप्रतिनिधी आहे या तत्त्वावर मावळ लोकसभेची जागा ही शिवसेना शिंदे पक्षाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच देण्यात आली. आता टीका करणारे राष्ट्रवादी व भाजपा नेते म्हणत आहेत, आपण महायुतीचा धर्म पाळणार. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी जे झाले, आम्ही जे बोललो ते नागरिकांनी विसरून जावे. मावळात खासदारांनी काय विकास केला हे जाहीरपणे विचारणारे नेते आता मतदारांकडे मते काय म्हणून मागणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता काय कामे केली ते जाऊ द्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे म्हणून मतदान करा असे सांगणार असल्याचे सांगण्यात आले. मागील दहा वर्ष श्रीरंग बारणे हे खासदार असताना विकासाच्या नावावर मते मागण्या ऐवजी आज देखील महायुतीला मावळात मोदींच्या नावाने मते मागण्याची वेळ आली आहे. मग विकासाच काय, व नेते मंडळी कोणाच्या विकासासाठी सर्व वाद बाजूला सारत एकत्र आली आहेत, याबद्दल नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. 

        महायुतीचा हाच फॉर्म्युला विधानसभेत राहिला तर ज्या पक्षाचा आमदार त्यांनाच मावळची जागा मिळणार आहे. यावर उत्तर देताना भाजपा नेते म्हणाले विधानसभेला महायुती ज्यांना उमेदवारी देईल आम्ही सर्व त्यांचे काम करणार. यामुळे आता लोकसभेला मावळ भाजपला धनुष्यबाणाचे व विधानसभेला घड्याळाचा प्रचार करावा लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत पुणे जिल्हा घड्याळ व पवार मुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या भाजपची मावळात व पुणे जिल्ह्यात तरी महायुती मुळे गोची झाली आहे. त्यामुळे जेथे घड्याळ तेथे घड्याळाचे व जेथे धनुष्यबाण तेथे धनुष्यबाणाचे काम करण्याची वेळ भाजपा वर पुणे जिल्ह्यात महायुतीमुळे आली आहे. यामुळे नेते मंडळी किती जरी आम्ही एक आहोत हे सांगत असले तरी पक्षाची विचारधारा मानणारे नागरीक व मतदार ही ॲडजस्टमेंट मानायला आज देखील तयार नाहीत. कालच्या पत्रकार परिषदेच्या उपस्थितीमध्ये ही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर बोलताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असे सूचक वक्तव्य देखील करण्यात आले आहे. 

     मावळ लोकसभेच्या प्रचारासाठी ज्यांच्यावर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, त्यांनी त्या पार पाडाव्यात, ज्यांना जबाबदारी देण्यात आली नाही त्यांनी देखील किंतू परंतु न बाळगता प्रचारात सक्रिय रहावे, आमच्यावर इतर मतदार संघातील जबाबदाऱ्या असल्या तरी प्रथम प्राधान्य मावळला देऊ असे आजी माजी आमदारांनी यावेळी सांगितले. तसेच आज जसे आम्ही एकत्र आलो तसे उद्या कार्यकर्ते देखील एकत्र येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सोमाटणे काय पण कोणताही टोलनाका हटणार नाही

मावळातील सोमाटणे टोलनाका बेकायदेशीर असून तो बंद करावा अन्यथा दुसरीकडे हटवण्यात यावा याकरिता मावळात मोठे आंदोलन उभे राहिले होते. याविषयावर बोलताना विद्यमान आमदार म्हणाले, सोमाटणे टोलनाका काय पण इतर कोणताही टोलनाका हटणार नाही. मावळातील जवळपास 95 टक्के नागरिक या टोलनाक्यावर मोफत प्रवास करत आहेत. विशेष म्हणजे, मावळातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी एकत्र येत हा टोलनाका हटावण्यसाठी आंदोलन उभे केले होते. 

इतर बातम्या

महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर