Breaking news

लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती; रात्री 3 तासात 150 मिमी पाऊस - सर्वत्र पाणीच पाणी

लोणावळा : लोणावळ्यात मध्यरात्रीनंतर ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अवघ्या तीन ते चार तासात शहर व परिसरात 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. भांगरवाडी, खत्री पार्क, कुसगाव, जुना खंडाळा भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

   खत्री पार्क येथील एका बंगल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही नागरिक घरात आडकले होते. शिवदुर्ग रेस्कू पथकाने पहाटे या सर्वांना घरातून सुरक्षित बाहेर काढले आहे. भांगरवाडी येथील पांढरे यांच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. अनेक साहित्य पाण्यावर तरंगत आहे. वलवण गावातील द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली मोठे पाणी साचले आहे. जुना खंडाळा गेट नं. 30 भागात पाणी साचले आहे. कुसगाव परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. 

    बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी पहाटे चार दरम्यान साधारण 150 ते 175 मिमी पाऊस झाल्याचा अंदाज टाटा कडून वर्तविण्यात आला आहे. ही ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असल्याने पाणी काही प्रमाणात ओसरू लागले आहे. लोणावळा नगरपरिषद आपत्कालीन पथक व शिवदुर्ग रेस्कू टिम रात्रभर मदतीचे काम करत आहे. पावसाच्या सोबत जोरदार वारा वाहत असल्याने शहरातील विविध भागातील विज गेली आहे. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहे जाणे टाळावे तसेच कोणत्या भागात पाणी साचले असल्यास त्या भागातील नागरिकांनी लोणावळा नगरपरिषदेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

    ग्रामीण भागात इंद्रायणी नदीला पुर आला असून नदीपात्रातील पाणी सर्वत्र पसरले आहे. वाकसई, कार्ला, मळवली, बोरज भागात नदीचे पाणी पसरले आहे. भाजे घरकूल परिसराला प‍ाण्याचा विळखा पडला आहे. 

इतर बातम्या