Maval MNS News l महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षपदी अशोक वसंत कुटे यांची नियुक्ती जाहीर

लोणावळा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षपदी वेहेरगाव येथील अशोक वसंत कुटे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक कुटे यांना मुंबई येथे सदरचे नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यामुळे मावळ मनसेला नवे नेतृत्व मिळाले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या स्थापनेपासून अशोक कुटे हे राज ठाकरे यांच्या समवेत मावळ तालुक्यामध्ये काम करत आहेत. राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन गेली 19 वर्ष ते मनसे पक्षामध्ये कार्यरत आहेत. मागील दहा वर्षापासून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी आघाडीचे मावळ तालुका अध्यक्षपद सांभाळले आहे. मावळ तालुक्यातील विविध सामाजिक विषयांवर त्यांनी आपल्या मनसे पद्धतीने आंदोलने केली आहेत व त्या आंदोलनांना अपेक्षित असे यश देखील प्राप्त झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वीज वितरण कंपनी, शिक्षण विभाग, लोणावळा नगरपरिषद, मावळ पंचायत समिती अशा विविध शासकीय यंत्रणांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवत व उपोषण आंदोलन याचा वापर करत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. आई एकवीरा देवीच्या पायथ्याशी असलेल्या वेहेरगाव या गावात ते राहत असल्याने देवीच्या मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवणे व वृक्षारोपण करणे यासारखे पर्यावरण पूरक उपक्रम देखील त्यांनी अनेक वेळा राबवले आहेत.
अशोक कुटे हे विद्यार्थी आघाडीमध्ये काम करत असले तरी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर देखील कायम आवाज उठवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येयधोरणे व राज ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. नुकतेच मराठी भाषा व मराठी पाट्या या विषयावर त्यांनी आंदोलन केले होते. बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये असणारे अधिकारी व कर्मचारी हे ग्राहकांची मराठी भाषेमध्ये बोलत नसल्याने त्यांनी बँकेचे अधिकारी यांची मनसैनिकांसह भेट घेत कान उघडणी केली होती. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वर्सोली टोल नाक्यावर दोन्ही बाजूला स्थानिकांसाठी एक लेन सतत सुरू ठेवावी. याबाबत त्यांनी नुकतेच आय आर बी व टोलनाका व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करत त्याले सुरू केल्या आहेत. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा अनाधिकृतपणे उभारलेल्या जाहिरात फलकांचे विरोधात देखील त्यांनी आवाज उठवला असून त्यावर योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. कायमच आपल्या हटके व नाविन्यपूर्ण अशा आंदोलनांमुळे ते चर्चेत राहिले आहेत. अशोक कुटे यांच्या या कामाची दखल घेत त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी मावळ तालुका अध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. या पुढील काळात देखील पक्षाची ध्येयधोरणे विचार, मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवत त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका पदाच्या माध्यमातून घेतली जाईल असा विश्वास या नियुक्तीनंतर मावळ माझा न्युज सोबत बोलताना अशोक कुटे यांनी व्यक्त केला आहे. लवकरच पत्रकार परिषद घेत मावळ तालुक्यातील समस्यांबाबत मनसेची भूमिका मांडणार असल्याचे अशोक कुटे यांनी सांगितले.