Breaking news

मोठी बातमी l मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आयटीएमएस प्रणालीद्वारे 52 ठिकाणी वाहनावर नजर; ई चलन द्वारे होणार कारवाई

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली अंतर्गत 52 ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रीम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रडारतंत्राचा वापर करुन वाहनांचा वेग मोजण्यात येत असून वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास अशा वाहनाना ई-चलान देण्यात येत आहे.

     पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबई पुणे महामार्गावर घाट परिसरामध्ये हलके मोटार वाहन (कार) ह्यांची वेग मर्यादा 60 किमी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा 40 किमी प्रतितास आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी हलके मोटार वाहन (कार) ह्यांची वेग मर्यादा 100 किमी प्रतितास असून उर्वरित सर्व वाहनांची वेग मर्यादा 80 किमी प्रतितास आहे.

      प्रणाली अंतर्गत बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे सीटबेल्ट परिधान न करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांना ई-चलान देण्यात येत आहे. तरी सर्व वाहन धारकांनी वाहतूक करतांना सर्व नियमांचे पालन करावे व वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत वाहनधारकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

इतर बातम्या