Breaking news

जखमी वानराचे वाचवले प्राण – वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची तत्परता

वडगाव मावळ : जांभुळ फाटा येथे रस्ता ओलांडताना एका वानराला दुचाकीची जोरदार धडक बसून ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेची माहिती कमलेश लोकरे व अभिनंदन अडसुल (ऍम्ब्युलन्स चालक) यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना दिली. माहिती मिळताच संस्था सदस्य जिगर सोलंकी, दिगंबर पडवळ आणि मयूर चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वानर झाडाझुडपात लपून बसला होता. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. 

      तत्काळ वनविभागाला याची माहिती देण्यात आली. काही वेळातच वनपरिमंडळ अधिकारी एम. एस. हिरेमठ, वनरक्षक पी. कासोळे आणि एस. मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. संस्थेच्या सदस्यांनी आणि वनविभागाच्या मदतीने वानराला सुरक्षितरित्या पकडून पुढील उपचारासाठी पुणे येथील भुगाव रेस्क्यू सेंटर येथे हलवण्यात आले. अशा प्रकारचे जखमी वन्यप्राणी दिसल्यास अथवा नाग-सरपट प्राणी मानवी वस्तीत आढळल्यास वन विभागाच्या 1926 क्रमांकावर किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या 9822555004 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.

इतर बातम्या