Breaking news

‘संवेदना’ या शब्दाची जाणीव गुन्हेगारी प्रवृत्तीला असतेच असे नाही - मितेश घट्टे (अपर पोलीस अधीक्षक - पुणे ग्रामीण)

मितेश घट्टे - अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण - ‘संवेदना’ या शब्दाची जाणीव गुन्हेगारी प्रवृत्तीला असतेच असे नाही. किंबहुना गुन्हेगारी प्रवृत्तीला जात, धर्म, भाषा वा प्रांत असा कोणताही शिक्का मारता येत नाही. विशेषतः लहान वयाच्या मुलांवर शारिरीक व मानसिक अत्याचाराच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होते. तेव्हा त्याचे गांभीर्य निश्चित जास्त असते. सामाजिक, मानसिक संवेेदना नष्ट होऊन ‘असंवेदनशील’तेचा कळस गाठणारा एखादा संशयित समोर येतो तेव्हा मनात प्रचंड चिड येते. कायद्याचा आदर रक्तात भिनलेला असल्याने अनेकदा चीड येऊनही स्वतःला सावरत गुन्हेगारी प्रवृत्तीला जरब बसवण्यासाठी आम्ही पोलीस प्रयत्नशील राहतो. 

      पोलीस तपास करीत असताना समाज मनाचे अनेक कांगोरे समोर येतात. त्यांना सामोरे जाताना काही वेळा मनात निराशेचे काळे ढग दाटून येतात. अशा घटनेने ‘संवेदना’ या शब्दाला पुरते चिरडून टाकत ‘असंवेदनशिल’तेचा कळस गाठल्याची जाणीव करुन देतात. समाजात मुली, स्त्रियांना आजही स्वतःचे आस्तित्व जपण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याचे उदाहरण म्हणजे अशा घटना तर नव्हेत ना? असा विचार घोळू लागतो.

        अत्यंत गोपनीयता बाळगून असा संवेदनशील तपास करावा लागतो.  आरोपीने केलेल्या कृत्याचे खरे रूप बाहेर आणताना पिडितेच्या कोमल बाल मनावरचे ओरखडे पुसण्याचेही भान ठेवावे लागते. पिडितेच्या घरातील वा शेजारचा कोणी वडिलधारा इसम कधी प्रेमाच्या नावाखाली तर कधी धाक दाखवून वासनेची भूक शमविण्यासाठी सरसावतो त्यावेळी ती गोष्ट जास्त दिवस लपून राहत नाही. कधी कधी अध्यात्माचा आव आणत तोळामोळा शरीर असणारा जर्जर आपले कृत्य जेव्हा कबूल करतो, तेव्हा एका बाजूला त्याच्याकडे पाहून चीड टोकाला जाते, अन् दुसरीकडे त्या निरागस मुलीकडे पाहून मनात हळहळीने कमालीचा भावनिक हुंदका येतो. जगाची सोडाच स्वतः च्या  शरीराची, मनाचीही ओळख न झालेल्या त्या निष्पाप मुलीवर आलेला प्रसंग समाजाच्या संवेदनेची वीण उसवत चालली आहे का? असा प्रश्न उभा करतो. गर्दीत राहणारी माणसे मनाने स्वतःला एकाकी समजत अपवादात्मकरित्या शारिरिक भूक भागवण्यासाठी सामाजिक संवेदनेचे लचके तोडण्याची मानसिकता घेऊन फिरत असतात हे या घटनेने समोर आणले. 

     सोशल मिडीया जगरहाटी बनलेला असून तो आता कोणत्या एका समूहापुरता मर्यादीत राहिलेला नाही. तो गावागावात, घराघरात पोहचला आहे. सोशल मिडीयावर व घरा घरात पाहिल्या जाणाऱ्या चित्र मालिकामधून दाखवला जाणारा लैंगिक स्वातंत्र्याचा स्वैराचार हा सुद्धा अशा घटनांना कारणीभूत ठरतोय असे म्हणायला वाव आहे. कारण प्रसार माध्यमातून लैंगिकतेचे आभासी चित्र तयार करून वास्तवाला छेद दिला जातोय आणि नेमके त्याचेच आकर्षण वेगाने वाढत आहे. या आभासी सोशल मिडीयाने अनेकांची मानसिक वृत्ती एका असंवेदनशील प्रवृत्तीत बदलते. यातून दुर्गा म्हणून गौरवली जाणारी, सरस्वती म्हणून पूजली जाणारी स्त्री अनेकदा आस्तित्वासाठी किती संघर्ष करते हा विचार सुन्न करतो. स्त्री-पुरूष समानता नक्कीच आहे, पण शहराच्या काही भागात आणि ग्रामीण भागातील वाड्यावस्तीत या समानतेचा वारा अजुनही फिरकलेला नाही असे चित्र डोळ्यासमोर येते. ते वास्तव आहे याची जाणीव अशा घटनांमधूून होते. 

     समाजात ठराविक मानसिकतेत उरलेली असंवेदनशिलता नष्ट करण्यासाठी सामाजिक संस्कार आणि सामाजिक शिक्षण याची बीजे रूजवावी लागतील. या बीजांचे संगोपन करावे लागेल. जेव्हा ही सामाजिक संस्काराची बीजे बाळसं धरतील तेव्हा त्याचे रूपांतर सुदृढ समाज रचनेच्या व्यापक वृक्षात होईल. हाच सामाजिक संस्काराचा व्यापक वृक्ष समाजातील मुली, स्त्रियांना सुरक्षिततेची सावली देईल. आपले पोलीस दल यासाठी कायमच प्रयत्नशील आहे. प्रत्येक मुलीला गुड टच...बॅड टच यांसह समाजात नेमके कोण कसे वागते याची जाणीव करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. पोलिसांच्या या प्रयत्नांना खूप वेळा यश येऊन कितीतरी गुन्हे घडण्यापुर्वी त्या प्रवृत्तींना आळा बसला आहे. यापुढेही हे प्रयत्न महाराष्ट्र पोलीस दलाकडून होत राहतील यात शंका नाही.

इतर बातम्या