Breaking news

खेळाडूंना क्रीडा कौशल्याच्या जोरावर विविध क्षेत्रांत संधी; रायगड अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथारे

खोपोली (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित उन्हाळी क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्व विकास शिबिराला अलिबाग येथील भव्य क्रीडा संकुलात उत्साहात सुरुवात झाली. या शिबिराचे उद्घाटन रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथारे आणि रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि सामाजिक कार्यकर्ते रिकी अगरवाल हे मान्यवरही उपस्थित होते.

सुमारे दीड महिना चालणाऱ्या या शिबिरात पारंपरिक लगोरीपासून ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेमबाजीपर्यंत विविध खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुमारे 150 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी या शिबिरात सहभागी होणार आहेत. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी सांगितले, “या शिबिरातून उद्याचे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचा आमचा उद्देश आहे.”

      अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथारे यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की, “महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या क्रीडा सुविधांचा लाभ तळागाळातील खेळाडूंना मिळावा आणि या माध्यमातून त्यांना विविध क्षेत्रांत यशस्वी होण्याची संधी मिळावी, हीच अपेक्षा आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या क्रीडा संकुलाला नवजीवन मिळाले, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.” शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे म्हणाले, “शिक्षणासोबतच खेळांची जोड अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना गुणपत्रिकेत बोनस गुण मिळतात, त्यामुळे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.”

      कार्यक्रमात हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते रिकी अगरवाल आणि पत्रकार धनंजय कवठेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षक यतीराज पाटील, तपस्वी गोंधळी, संदीप गुरव, देवीदास पाटील, भरत गुरव, पुरुषोत्तम पिंगळे, संतोष जाधव, नागेश शिंदे, वीरेंद्र पवार, माधवी पवार, आदि लाड, तुशांत मढवी, सिद्धार्थ पाटील, प्रियंका गुंजाळ, दिव्या मोकल यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशिक्षक यतीराज पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी नेमबाजी, कराटे, लाठी-काठी, लगोरी यांसारख्या खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच, मान्यवरांनी बॅडमिंटन खेळून उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

इतर बातम्या

Sangmeshwar l राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील; छत्रपती संभाजी स्मारक भव्य दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार