Breaking news

चर्चा तर होणारच | मावळ महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी घेतले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आशीर्वाद ?

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार व एके काळचे अजित दादा पवार यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी येथील एका लग्न सोहळा दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना खाली वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले यामुळे राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. आमदार आण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नात हा प्रसंग घडला.

     संजोग वाघेरे पाटील हे अजित दादा पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये अजित दादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा संजोग वाघेरे यांनी सांभाळली होती. त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दोन लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीमध्ये मात्र राज्यात राजकीय उलथापालती झाल्याने अजित दादा पवार यांनी वेगळी भूमिका घेत भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे पक्षाच्या सोबत युती केली. व अजित दादांचे समर्थक असलेले संजोग वाघेरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत मावळ लोकसभेची उमेदवारी मिळवली. मावळ लोकसभेची जागा ही पूर्वीपासून शिवसेनेच्या वाट्याला असल्याने महायुतीकडून देखील सदर जागा ही शिवसेना पक्षाला व महाविकास आघाडीकडून देखील शिवसेना पक्षालाच जाणार असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असलेले संजोग वाघेरे यांनी वेळीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. ही अजितदादा पवार यांची खेळी असल्याचे मागील काही दिवसांपासून सतत चर्चिले जात आहेत. अजितदादा यांनी मात्र मी कोणाला कोठे पाठविलेले नाही असे स्पष्ट केले आहे. 

      महायुती झाल्याने ज्या खासदार श्रीरंग बारणे यांनी आपला मुलगा पार्थ पवार याचा दारुण पराभव केला त्यांचाच उमेदवारी अर्ज भरण्याचा व प्रचार करण्याची वेळ अजित दादा पवार यांच्यावर आली आहे. असे असले तरी दुसरीकडे मुलाचा पराभव देखील त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. रोहित पवार यांनी देखील मागील आठवड्यामध्ये मावळ लोकसभेतील पार्थ पवार यांचा पराभव आम्ही विसरलेलो नाही फार च्या पराभवाचा बदला घेण्यासाठीच मी मावळात आलो असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना संजोग वाघेरे पाटील यांनी वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतल्याने विविध राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून वाघेरे हे अजित दादांचेच असल्याचे म्हटले जाऊ लागले आहे. वाघेरे यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले, समोरच्या मोठ्या व्यक्तीचा आदर करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. अजित दादा हे राज्यातील मोठे नेते आहेत त्यांना वाकून नमस्कार करणे व आशीर्वाद घेणे यात काही गैर आहे असे मला वाटत नाही असे सांगितले.

इतर बातम्या