Breaking news

Maval Loksabha 2024 : मावळ लोकसभेसाठी शिवसेना शिंदे पक्षाकडून खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभा मतदार संघात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडी, आरोप यानंतर अखेर आज मावळ लोकसभेची जागा महायुतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना थोडक्यात शिंदे पक्षाच्याच वाट्याला असल्याचे स्पष्ट झाले असून या ठिकाणाहून महा संसद रत्न खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी आज जाहीर करण्यात आली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला आहे. शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. त्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

      खरंतर मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार हा मीच असणार असे काही महिन्यांपूर्वीच खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीर करून टाकले होते. मात्र महायुती मधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष यांनी मात्र बारणे यांच्या उमेदवारीवर जोरदार आक्षेप घेतला होता. एक वेळ आम्ही नोटाला मतदान करू मात्र बारणे यांना मतदान करणार नाही, एवढी टोकाची भूमिका घेण्यात आल्यानंतर देखील आज शिवसेना शिंदे पक्षाकडून सर्व विरोध झुगारून खासदार श्रीरंग बारणे यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मी केलेली विकास कामे व माझ्या मतदारसंघातील मतदारांशी माझा असलेला संपर्क या बळावर मी ही निवडणूक जिंकेल असा विश्वास उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला होता. आता मात्र उमेदवारी जाहीर झालेली आहे व ज्यांनी बारणे यांना टोकाचा विरोध केला ती मावळ भाजपा व राष्ट्रवादी त्यांना साथ देणार की यापूर्वी घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे.

     दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मावळ लोकसभा मतदारसंघासाठी संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर आज बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मावळ लोकसभेचा सामना हा संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे असाच होणार हे आता निश्चित झाले आहे. संजोग वाघेरे हे पूर्वीपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये होते. मात्र मावळ लोकसभेची जागा ही शिवसेनेच्या वाटेवर असल्याने त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. दोन दिवसापूर्वी त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होऊन त्यांच्या नावाची घोषणा झाली. मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेवर असून ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवला त्याच वेळी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाचे केंद्रातील नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट केले होते असे काही महिन्यांपूर्वी श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केले होते.

      महायुती मधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला अनेक वेळा जाहीरपणे विरोध केला. मात्र माजी उमेदवारी निश्चित आहे व मीच उमेदवार असणार आहे या आपल्या मतावर खासदार श्रीरंग बारणे हे शेवटपर्यंत ठाम राहिले होते. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी तर बारणे यांना उमेदवारी का देऊ नये याचा अहवालच वरिष्ठांना सादर केला होता. तसेच त्यांनी मतदारसंघात दहा वर्षात काय कामे केली हे जनतेसमोर जाहीर करावे असे खुले आव्हान दिले होते. मात्र मी कोणालाही खुलासा द्यायला बांधील नाही अशा शब्दात बारणे यांनी सुनील शेळके यांचे आव्हान टोलवून लावले होते. मावळतील भाजपाने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना मावळ लोकसभेची उमेदवारी मिळावी याकरिता त्यांच्या घरी एकत्र जमत खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात आगपाखड केली होती. एक वेळेस भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नोटाला मतदान करतील पण यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांना मतदान करणार नाही, अशी टोकाची भूमिका त्यावेळी मांडण्यात आली होती. त्यावर देखील प्रतिक्रिया देताना खासदार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी जाहीर होऊ द्या असेच सुचक वक्तव्य करत कोणती प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.

     आता मात्र भाजपा व राष्ट्रवादी यांचा सर्व विरोध झुगारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळ लोकसभेसाठी दोन वेळचे खासदार राहिलेले महासंघरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व बाळासाहेबांची शिवसेना हे तीनही पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला एकत्र पणाने सामोरे जाणार असल्याने तिने पक्षाच्या कार्यकर्त्यांना खासदार श्रीरंग बारणे यांचे काम करावेच लागणार आहे. वरिष्ठांची ही भूमिका असली तरी ज्यांनी टोकाचा विरोध केला ते भाजपा पदाधिकारी व मावळ राष्ट्रवादीचे आमदार हे मतदारांसमोर आता कोणती भूमिका घेऊन मते मागायला जाणार याबाबत उमेदवारी जाहीर होताच चर्चांना उधाण आले आहे.

      

इतर बातम्या