Breaking news

Maval Loksabha Election | जोरदार शक्ती प्रदर्शन करत संजोग वाघेरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

मावळ माझा न्युज नेटवर्क : जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज मावळ लोकसभेचे महा विकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत मारुतीरायाचे दर्शन घेत हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या समवेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जगताप, शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, आमदार रोहित पवार, आमदार बाळाराम पाटील, खासदार अमोल कोल्हे मावळातील ज्येष्ठ नेते माऊली भाऊ दाभाडे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   श्री काळभैरवनाथ मंदिर पिंपरीगाव, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, साई चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक शगुन चौक, काळेवाडी, चिंचवडगाव, मोरया गोसावी गणपती मंदिर चिंचवड, वीर चाफेकर बंधू स्मारक, चिंचवड स्टेशन, श्री खंडोबा मंदिर आकुर्डी अशी ही रॅली काढण्यात आली होती. पुढे पदयात्रा खंडोबामाळ चौक, म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे येऊन PMRDA कार्यालयात नामनिर्देशन अर्ज दाखल करून आकुर्डी रेल्वे स्टेशन याठिकाणी जाहीर सभा झाली.

    या सभेमध्ये बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले माझा भाऊ पार्थ पवार यांच्या झालेल्या पराभवाचा बदला या निवडणुकीत घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. खासदार श्रीरंग बारणे यांनी माझा भाऊ व अजितदादा पवार यांचा मुलगा पार्थ पवार याचा पराभव केला आहे. मुलाच्या पराभवाचा विसर पडल्याने अजित पवार काल बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. ते हा पराभव विसरला असले तरी भाऊ म्हणून मी तो पराभव विसरणार नाही. माझ्या भावाच्या व अजितदादा पवार यांच्या मुलाच्या पराभवाचा बदला घेण्याची ही निवडणूक आहे. खासदार अमोल कोल्हे म्हणाले, या निवडणुकीत गद्दरांना त्यांची जागा दाखवायची आहे. याकरिता हाताच्या वज्र मुठीत स्वाभिमानाची मशाल घेत विजयाची तुतारी वाजवायची आहे. मारुतीरायाने रावणाचा गर्व हरण करण्यासाठी शेपटीची मशाल करत लंका दहन केली, ती मशाल सर्वांनी ध्यानात ठेवा. आदित्य ठाकरे म्हणाले, ही निवडणूक गद्दाराच्या विरोधात स्वाभिमानी शिवसैनिकांची आहे. महाराष्ट्रातील रोजगार परराज्यात पळवत येथील युवकाचा रोजगार हिरावून घेणाऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकरी, महिला, कामगार यांना महागाईच्या खाईत लोटणाऱ्या धनिक धार्जिणांच्या विरोधात आहे.

      संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवडणुकीमध्ये विजयाची मशाल पेटवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. मागील दहा वर्षात मावळ लोकसभा मतदारसंघात ठोस अशी दहा कामे देखील ज्यांनी केली नाहीत, अशांना त्यांची जागा दाखवून देण्याची ही निवडणूक असल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर म्हणाले संजोग वाघेरे यांच्या रूपाने एक निष्कलंक व स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार महाविकास आघाडी कडून मावळ लोकसभेसाठी देण्यात आला आहे. त्यांना मावळ लोकसभेतून मोठे मताधिक्य देत गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी युवा वर्ग एकवटला आहे. आजची उपस्थिती ही उद्याच्या विजयाची नांदी आहे.



इतर बातम्या