Breaking news

संजोग वाघेरे यांची महाराष्ट्रातील जाहीर झालेली पहिली उमेदवारी आहे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करत गद्दारांना घरी बसवा - उद्धव ठाकरे

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची महाराष्ट्रातील जाहीर झालेली पहिली उमेदवारी आहे. मागील दोन महिन्यांपासून त्यांचा प्रचार सुरू असून ते मावळ लोकसभा मतदारसंघात घराघरात पोहोचले आहेत. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करत गद्दारांना घरी बसवण्याची ही निवडणूक असल्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरी येथील सभेत शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये आलो आहोत. आमचा पक्ष व पक्षाचे चिन्ह चोरण्याचा प्रयत्न भाजपा व मिंदे यांनी केला आहे. ज्या शिवसेनेकडे संपूर्ण महाराष्ट्र व देश मराठी समाजाची अस्मिता म्हणून पहात होता. ज्या बाळासाहेबांचे आर्शिवाद घेऊन भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली. मोदी पंतप्रधान झाले, आम्ही त्यांना आलिंगन दिले व त्यांनी पाठीत वार केला. शिवसेनेला फोडण्याचे पातक भाजपने केले आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही. ज्या गद्दारांनी त्यांना साथ दिली त्या गद्दारांना गाडल्याशिवय हा महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही. अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ज्याप्रमाणे मोदी सरकार यांनी अचानकपणे नोटाबंदी करत चलनात असलेल्या नोटांची रद्दी केली त्याचप्रमाणे चार जूनच्या निकालानंतर मोदी नावाचे नाणे चलनातून बंद होईल व ते फक्त नरेंद्र मोदी म्हणून राहतील असा हल्लाबोल या सभेत ठाकरे यांनी केला आहे.

        मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या  प्रचारार्थ सांगवी येथील पी.डब्लु. डी. मैदानावर (इंडिया) महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली. मावळवासियांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत असलेली निष्ठा आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्यावर असलेलं प्रेम ह्या सभेत स्पष्ट दिसून आलं. सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, आप पक्षाचे प्रवक्ते संजय सिंग, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, शिवसेना संघटक व आमदार सचिन अहिर, जिल्हाप्रमुख व माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम,  शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले आदीसह इंडिया - महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. संजोग वाघेरे हा विकासाचा ध्यास असलेला चेहरा असल्याने मावळ लोकसभा मतदार संघातील मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे.

     यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याकडे साधारणपणे भुताची भीती असते, भाजपाला पराभवाच्या भुताची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे पंतप्रधान गल्लीबोळात रोड शो करत आहेत. जनतेने आणले का नाही रस्त्यावर?  शिवसेनेची भडकलेली मशाल हुकूमशाही मोदी सरकारचे आसन जाळून भस्मसात करेल. महाराष्ट्र हा मर्दांचा प्रांत आहे. महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल, असे इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'भाजपसमोर 2014 व 2019 नंतर आता कोणतेच मुद्दे नाहीत. म्हणून हिंदू मुस्लिम असा जातीयवाद केला जात आहे. नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग होता, असे सर्वोच्च न्यायालयातील एका माजी न्यायाधीशांनी सांगितले आहे. खरे तर हे गजनी सरकार आहे. कारण प्रत्येक वेळी वेगळे बोलताना, मागे काय बोलले होते त्याची त्यांना आठवण होत नाही म्हणून मागील दहा वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनांवर ते बोलायला तयार नाही. 

        अग्निविरांच्या माध्यमातून त्यांनी जवानांच्या भविष्यांशी खेळण्याचे धोरण आखले आहे, संरक्षण विभागाचे कंत्राटीकरण केले जात आहे. त्यामुळे राम कृष्ण हरी अन पाठवा त्यांना घरी! असे जनताच म्हणत आहे. 

ठाकरे म्हणाले, मुबंईत गुजरातची कंपनी मुंबईमध्ये मराठी माणसांना प्रवेश नाही, अशी जाहिरात देते. ही कसली मानसिकता. आम्ही गुजराती बांधवांच्या विरोधात नाही, पण अशा मानसिकतेच्या विरोधात मराठी माणूस पेटून उठेल. महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्यांना व शिवसेनेचे तुकडे करणाऱ्या गद्दारांना जनता आता माफ करणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या