Breaking news

कारण - सत्ताकारण | ज्यांनी मावळचं पाणी दाखवलं, त्यांनाच विजयी करा सांगण्याची वेळ आली !

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेच्या माध्यमातून मुलगा पार्थ पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करत त्याला लोकसभेत पाठवण्याचे स्वप्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी 2019 साली पाहिले होते. मात्र शिवसेनेचे प्रतिस्पर्धी खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा तब्बल दोन लाखाहून अधिक मतांनी पराभव करत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला खिळ लावली. राजकारण व सत्ताकारणामध्ये सध्या महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना शिंदे पक्ष व राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्ष यांची महायुती आहे. 2024 साली महायुतीमध्ये मावळ लोकसभेची जागा पुन्हा शिवसेना शिंदे पक्षाला गेल्याने व खासदार श्रीरंग बारणे यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने ज्यांनी मुलाला मावळचे पाणी दाखवले त्यांनाच विजयी करा असे कार्यकर्त्यांना सांगण्याची वेळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आली आहे.

खरंतर मावळ राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. श्रीरंग बारणे यांनी मागील दहा वर्षांमध्ये मतदारसंघात काय विकास कामे केली हे जाहीर करावे मगच उमेदवारी मागावी अशा स्वरूपात त्यांच्यावर टीका केली होती. तसेच बारणे हे कोणत्याही चिन्हावर उभे राहिले तरी त्यांचा प्रचार करणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती. आता मात्र त्यांनी आपल्या भूमिक वरून यू टर्न घेतला असून आम्ही महायुतीचा धर्म पाळणारा असून अजित दादा देतील तो आदेश मान्य करत महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे नमूद केले आहे. अजित दादा पवार यांना देखील महायुतीचा धर्म पाळताना ज्या खासदार श्रीरंग बारणे यांनी मुलाचा पराभव केला त्याच श्रीरंग बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे मावळ लोकसभा मतदारसंघात सांगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मने दुखावलेल्या कार्यकर्त्यांची मात्र मोठी कुचंबणा झाली आहे.

      मावळ भाजपा व पिंपरी चिंचवड भाजपा यांनी देखील खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मावळ भाजपाचे पदाधिकारी यांनी तर टोकाची भूमिका घेत एक वेळ नोटाला मतदान करू पण श्रीरंग बारणे यांना मतदान करणार नाही असे पत्रकार परिषद घेत स्पष्टच केले होते. मागील पाच वर्षांमध्ये श्रीरंग बारणे यांनी भाजपच्या कोणालाच विश्वासात घेतले नाही अशा शब्दात त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता मात्र महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे पक्षाला मिळाल्याने व खासदार श्रीरंग बारणे यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने बारणे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांचे देखील अडचण झाली असून ज्यांच्यावर टोकाची टीका केली त्यांचा प्रचार आता कसा करावा असा प्रश्न देखील त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. वास्तविक मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा व राष्ट्रवादी या पक्षांची सर्वाधिक ताकद आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे फार प्राबल्य या मतदारसंघात नाही. मात्र पूर्वीपासून मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत शिवसेनेचे खासदार विजयी झाल्याने यावेळी देखील सदरची जागा ही शिवसेनेलाच देण्यात आली आहे. महायुतीमधून शिवसेना शिंदे पक्षाचा उमेदवार तर महाविकास आघाडी मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार देण्यात आल्याने यावर्षीची लढत ही शिंदे विरुद्ध ठाकरे अशीच होणार असून दोन्ही पक्षांची मदार ही मित्र पक्षांच्या मदतीवर असणार आहे.

      दोन वेळचे संसदरत्न खासदार विरुद्ध नवखा उमेदवार अशी ही लढत असणार आहे. महाविकास आघाडीचे संजोग वाघिरे हे नवखे उमेदवार असले तरी 2014 व 2019 साली राष्ट्रवादीचे मावळ लोकसभेचे उमेदवार राहुल नार्वेकर व पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलेला असल्याने ते मतदारसंघांमध्ये नवखे असले तरी मतदारांच्या ओळखीचे आहेत. दुसरीकडे श्रीरंग बारणे हे मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा नशीब आजमावत असून कोणत्याही लाटेवर नाहीतर मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर विजयाचे हॅट्रिक होईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. राज्यात विविध ठिकाणच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडी व महायुती यांच्यामधील तिढा अद्याप कायम असल्याने या उमेदवारांना त्यांचे मित्र पक्ष किती साथ देणार यावर दोघांच्या विजयाची गणिते अवलंबून असणार आहे.

इतर बातम्या