मोठी चोरी l लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल लांबवला; अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल
लोणावळा : पर्यटन नगरी लोणावळ्यातील वलवण बाराबंगला परिसरात एका बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोराने सोने-चांदीचे दागिने, हिरे आणि रोख रकमेसह एकूण १४ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:४५ ते ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास वलवण येथील 'गजल बंगलो, बाराबंगला' परिसरात घडली. अज्ञात चोराने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने बंगल्याच्या मागील कंपाउंडवरून आत प्रवेश केला. त्यानंतर पत्र्याच्या शेडवरून गॅलरीत जाऊन, गॅलरीचा मुख्य दरवाजा कशाच्या तरी साह्याने तोडून आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान ऐवज चोरून पोबारा केला. सोन्याचे व हिऱ्याचे दागिने तसेच दीड लाख रुपये रोख असे एकूण 14 लाख 15 हजार रुपयांची चोरी या ठिकाणी झाली आहे.
या प्रकरणी फिर्यादी निलेश श्रीकृष्ण वर्तक (वय ५६, रा. सह्याद्री फार्म्स, वलवण, लोणावळा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (A) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक (PSI) चंदनशिव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

















