Breaking news

प्रशिक्षित आपदा मित्र आणि सखी कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज : तहसीलदार आयुब तांबोळी

खोपोली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन संदर्भात खालापूर, खोपोली, चौक, माथेरान आणि कर्जत मधील सर्वसामान्य नागरिकांसाठी 12 दिवसांचा "आपदा मित्र आणि आपदा सखी" प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. 

       कर्जतचे प्रांताधिकारी अजित नेराळे, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सागर पाठक, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत "आपदा मित्र आणि आपदा सखी" प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी याक एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या सभागृहात रायगड नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या प्रशिक्षण कालावधीत अभ्यास वर्गातून भौतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष फील्डवर नेऊन प्रशिक्षणार्थी यांना आपत्कालिन प्रसंगात कोणत्या उपाय योजना राबवाव्यात याचे  प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले गेले. या माध्यमातून आपत्कालीन प्रसंगात जीवित आणि वित्त हानी रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची विस्तृत माहिती देऊन त्यांची उजळणी करून घेण्यात आली. 

     आपदा मित्र आणि सखींना खडतर प्रशिक्षण कालावधीत दिलेले धडे गिरवण्यासाठी मॉकड्रिल आणि चाचण्याही घेण्यात आल्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक आपदा मित्र आणि आपदा सखीला रुपये 15 हजार रुपये बाजार मूल्य असणारे संकट समयी आवश्यक असणारे जुजबी साहित्य दिले गेले. त्याचप्रमाणे 5 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा, प्रमाणपत्र व ओळखपत्रही दिले जाणार आहे. प्रशिक्षणाच्या समारोप समारंभात तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आसावरी पाटील या उपस्थित होत्या. या प्रशिक्षण कार्यक्रमातून तयार झालेले आपदा मित्र आणि सखी दोन्ही तालुक्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी संकट मोचन ठरतील असा विश्वास यावेळी मान्यवरांच्या प्रतिपादनातून व्यक्त करण्यात आला आणि प्रशिक्षणार्थींचे कौतुक करण्यात आले.

      प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी याक एज्युकेशन इन्स्टिट्यूट, अल्टा लायब्रोटरिज, शिवदुर्ग मित्र लोणावळा, खत्री फार्म - कलोते, कॅम्प मॅक्स - कलोते, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल, महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाची देवदूत यंत्रणा, टाटा स्टील कंपनीची फायर ब्रिगेड अशा विविध संस्थांचे आणि खालापूर तालुका महसूल विभागाचे सहकार्य लाभले. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, सह्याद्री ट्रेकर्स माथेरान, ताराराणी ब्रिगेड, यशवंती हायकर्स, आय आर बी, टाटा स्टील, विविध कंपन्या, पत्रकार आणि दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

इतर बातम्या