Breaking news

मोठी बातमी l पाटण गावावर अस्मानी संकटानंतर सुलतानी संकट! दरडीच्या भीतीने गाव खाली करताच चोरट्यांनी अनेक घरे फोडली

लोणावळा : मावळ तालुक्यातील पाटण गावाला निसर्गाच्या कोपानंतर आता मानवनिर्मित संकटाचा सामना करावा लागत आहे. ६ जुलै रोजी घडलेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण गाव खाली करण्यात आले होते. मात्र, याच आपत्तीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी बुधवारी (८ जुलै) रात्री गावात अक्षरशः हैदोस घातला. एकाच रात्री १५ ते २० बंद घरांची कुलूपे आणि कड्या तोडून लाखो रुपयांचे दागदागिने व रोख रक्कम लंपास केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या दुहेरी संकटामुळे पाटण ग्रामस्थांमध्ये तीव्र भीती आणि प्रशासनाविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

नेमके काय घडले?

६ जुलै रोजी डोंगराच्या कुशीत वसलेल्या पाटण गावात दरड कोसळून एकाच घरातील ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाटण गावाला मोठा धोका निर्माण झाल्याचे पाहत प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना गाव खाली करण्याचे आदेश दिले. जीवाच्या भीतीने व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी आपली घरे बंद केली आणि ते नातेवाईकांकडे किंवा सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले.

       गाव संपूर्णपणे सुने असल्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. बुधवारी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत चोरट्यांनी गावात प्रवेश केला आणि एकामागून एक तब्बल १५ ते २० घरांच्या कड्या व कुलूपे तोडून घरफोड्यांचा सपाटा लावला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून चोरटे पसार झाले.

"आम्ही गाव खाली केले, मग प्रशासनाने सुरक्षा का केली नाही?" – ग्रामस्थांचा संतप्त सवाल

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गावात धाव घेतली. आपल्या घरांची झालेली दुरवस्था आणि चोरीला गेलेला ऐवज पाहून नागरिकांचा संयम सुटला. "प्रशासनाच्या सूचनेचा मान राखून आम्ही आमची घरे दारे सोडून बाहेर गेलो. मग आमच्या मागे गावाची आणि आमच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी प्रशासनाची नव्हती का? गावात किमान दोन पोलीस कर्मचारी जरी गस्तीला ठेवले असते, तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. एका बाजूला हक्काचे घर सोडून जाण्याचे दुःख आणि दुसरीकडे साठवलेली पुंजी चोरीला गेल्याचा धक्का, आम्ही आता जगायचे कसे?" असा प्रश्न  संतप्त ग्रामस्थानी उपस्थित केला आहे. 

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:

1)नुकसान भरपाई मिळावी : नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच हवालदिल झालेल्या नागरिकांना या चोरीमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

2) चोरांना तात्काळ अटक : पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा. तसेच नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेणाऱ्या या चोरट्यांना कडक शासन करावे.

3) गावात २४ तास पोलीस बंदोबस्त : जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत रिकाम्या असलेल्या पाटण गावात २४ तास पोलीस गस्त तैनात करण्यात यावी.

      या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यात खळबळ उडाली असून, आपत्तीच्या काळातही माणुसकी विसरणाऱ्या चोरट्यांचा आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा सर्वत्र निषेध केला जात आहे. आता यावर मावळ तालुका प्रशासन आणि सरकार काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या