मोठी बातमी l लोहगड किल्ला केतन अग्रवाल हत्याकांड: पोलिसांकडून थरारक 'सीन रिक्रिएशन'; हत्येचा थरार पुन्हा जिवंत
लोणावळा : लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन वेग मिळाला आहे. १८ जून रोजी घडलेल्या या थरारक घटनेचा नेमका माग काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी आज (२८ जून) आरोपींना सोबत घेऊन लोहगड किल्ल्यावर 'सीन रिक्रिएशन' (घटनेचे प्रात्यक्षिक) केले. यावेळी मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना कडक पोलीस बंदोबस्तात किल्ल्यावर नेण्यात आले होते.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक राजेंद्र मायणे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्यासह पोलिसांचे मोठे पथक सकाळी सात वाजताच दोन्ही आरोपींना घेऊन लोहगड किल्ल्यावर पोहोचले.
असा रचला हत्येचा थरार…
गडाच्या पायथ्यापासून ते थेट मुख्य घटना स्थळापर्यंत १८ जून रोजी नेमकं काय घडलं, याचा प्रत्येक क्षणाचा घटनाक्रम पोलिसांसमोर पुन्हा उभा करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी खालील बाबींचे प्रात्यक्षिक करून घेतले:
1)किल्ल्यावर चढताना कोणत्या ठिकाणी सियाने तिचा मित्र चेतनला इशारा केला?
2) मुख्य घटनास्थळी पोहोचल्यानंतर सिया नेमकी कशी खाली बसली?
3) केतनला गाफील ठेवून त्याला दरीत कशा पद्धतीने ढकलण्यात आले?
या संपूर्ण प्रक्रियेची अचूकता तपासण्यासाठी पोलिसांनी एका मानवी आकाराच्या पुतळ्याचा देखील वापर केला. पुतळा दरीत ढकलून हत्येची ती भयंकर पद्धत पडताळून पाहण्यात आली.
अपघाताचा बनाव; पण पोलिसांच्या चाणाक्षतेने गुन्हा उघड
१८ जून रोजी केतन अग्रवाल या तरुणाचा लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय तपास केला असता, हा अपघात नसून एक थंड डोक्याने रचलेला पूर्वनियोजित खून असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच तिच्या मित्राच्या (चेतन चौधरी) मदतीने हा कट रचला होता. या खुलाशानंतर संपूर्ण प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
साखरपुडा झाला, पण लग्न करायचे नव्हते!
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांचा विवाह ठरला होता व चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडाही झाला होता. लग्नाला वरवर होकार दिला असला तरी सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. याच कारणातून तिने केतनचा काटा काढण्याचे ठरवले. धक्कादायक बाब म्हणजे, केतनला संपवण्यासाठी तिने तब्बल तीन वेळा त्याला लोहगड किल्ल्यावर आणले होते आणि अखेर १८ जून रोजी तिने आपल्या मनसुब्यात यश मिळवले.
१५ जणांची चौकशी, पुराव्यांना मिळणार बळकटी
केतन अग्रवाल हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कमालीची गोपनीयता आणि तत्परता दाखवली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याशी संबंधित असलेल्या जवळपास १५ संशयित व्यक्तींची आतापर्यंत चौकशी करण्यात आली असून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आज करण्यात आलेल्या सीन रिक्रिएशनमुळे न्यायालयात या गुन्ह्याची साखळी सिद्ध करण्यासाठी आणि आरोपींविरोधातील पुराव्यांना कायदेशीर बळकटी मिळण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करत आहेत.





















