Breaking news

मावळातील प्रमोद परब यांनी विकसित केलेल्या ब्लॉक मॅनेजमेंट सिस्टीम मुळे रेल्वे ब्लॉकच्या प्रक्रियेला वेग

लोणावळा : तळेगाव मावळ येथे राहणारे मध्य रेल्वेचे वाहतूक निरीक्षक, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमोद परब व नितीन अतिगुरु यांनी विकसित केलेल्या ब्लॉक मॅनेजमेंट सिस्टीम मुळे रेल्वे ब्लॉकच्या प्रक्रियेला वेग येत असल्याने याची दखल रेल्वे बोर्डाने घेतली आहे.

      प्रमोद परब व नितीन अतिगुरू यांनी उच्च दर्जाचे इन हाऊस ब्लॉक मॅनेजमेंट सिस्टीम (बीएमएस) हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरमुळे दररोज रात्री लोकल सेवा बंद झाल्यानंतर घेण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या ब्लॉकचे काम मोठ्या जलद गतीने होण्यास मदत झाली आहे. याशिवाय रेल्वेच्या सुरक्षिततेत मोठी भर पडली आहे. यामुळे विक्रमी पावसानंतर देखील मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या न थांबता यावर्षी सातत्याने धावत आहेत.

     हे सॉफ्टवेअर त्यांनी युट्युब आणि इंटरनेटच्या मदतीने विकसित केले आहे. गेल्या सहा महिन्यापासून ते यावर काम करत होते. बीएमएस सॉफ्टवेअर मार्फत सिंग्नलिंग, टेलीकॉम, इंजीनियरिंग, इलेक्ट्रिक सारख्या अनेक विभागांचे 38 हजार 193 ब्लॉक संबंधित कामाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे ब्लॉक घेऊन होणारी कामाची संपूर्ण यंत्रणा आता पेपरलेस झाली आहे. याविषयी बोलताना मध्य रेल्वेच्या वाहतूक निरीक्षक प्रमोद परब म्हणाले सदरचे सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी आम्हाला सहा महिन्याचा कालावधी लागला. हे सॉफ्टवेअर विकसित करताना अनेक अडचणी आल्या मात्र इंटरनेट आणि युट्यूब ची मदत घेऊन ते सॉफ्टवेअर विकसित केले आहे. याचा वापर सध्या मध्य रेल्वे करत आहे. आजमितीला ही वेब बेस्ट प्रणाली आहे आता आम्ही याला मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हाला मध्य रेल्वेने दिलेल्या संधीचे सोने झाले असे परब यांनी सांगितले. परब हे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास असून लोहमार्गावरील मंकीहिल येथे त्यांनी बराच काळ सेवा बजावली आहे.

इतर बातम्या