निलंबित मुख्याधिकारी एन.के. पाटील यांच्या मालमत्तेची व त्यांच्या कामकाजाची होणार चौकशी - आमदार सुनील शेळके
मावळ माझा न्युज नेटवर्क : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे निलंबित करण्यात आलेले मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मालमत्तेची व तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकाळामधील त्यांनी केलेल्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडत निलंबित मुख्याधिकारी यांच्या मालमत्तेची व त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
मावळ माझा न्युज चा वाॅटस्अप ग्रुप जॉईन करा
आमदार सुनील शेळके म्हणाले मागील दीड वर्षांपूर्वी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी एन. के. पाटील रुजू झाले होते. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची मुदत संपल्याने मागील अडीच वर्षापासून नगरपरिषदेचा कारभार मुख्याधिकारी व प्रशासक यांच्या माध्यमातून सुरू आहे. मुख्याधिकारी एन.के. पाटील हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मनमानीपणाने कारभार करत होते. महिला कर्मचारी यांच्यासोबत त्यांचे वागणे हे अशोभनीय व अशलाग्य होते, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातच त्यांनी महिनाभरापूर्वी भर दिवसा दारू पिऊन त्यांच्या गाडीने दोन वाहनांना धडक देऊन अपघात केला. त्यांच्या कामकाजाबाबत नागरिक समाधानी नव्हते अनेक वेळा त्यांच्या विरोधात आंदोलने देखील झाली आहेत. जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा अहवाल दिल्यानंतर शासनाच्या माध्यमातून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे मात्र केवळ निलंबन करून चालणार नाही तर त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेले कामकाज व त्यांची मालमत्ता या सर्वांची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेच्या अधिवेशनात केली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी एक आयएस अधिकारी व एक आयपीएस अधिकारी यांची समिती तयार करून त्या समितीच्या माध्यमातून त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.