Breaking news

Rescue operation : ढाक बहिरी च्या कड्यावरून खोल दरीत पडलेल्या तरुणाचे यशस्वी रेस्कु

ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी मावळ माझा न्युज चा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा 

लोणावळा : राजमाची किल्ला परिसरात असलेल्या ढाक बहिरी या ठिकाणी एका ग्रुपसोबत गाईड म्हणून गेलेला स्थानिक आदिवासी मुलगा पायऱ्यांवरुन तोल जाऊन साधारण 80 ते 90 फूट खाली दरीत पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला, पाठीला व खांद्याला जबर मार लागला होता. अशा अवस्थेत असलेल्या या मुलाला लोणावळ्यातील शिवदुर्ग बचाव पथकाकडून रेस्कु करीत दरीतून बाहेर काढण्यात आले.

      सोमवार (25 मार्च) रवींद्र होला (वय 24 वर्ष, सांडशी, कर्जत) नावाचा युवक चार पर्यटकांचा एक ग्रुप घेऊन ढाक बहिरी याठिकाणी गेला होता. वर जात असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पायऱ्या चढून जात असताना रवींद्र याचा तोल गेला आणि तो खाली पडून हा अपघात झाला. पण सुदैवाने रवींद्र याचा जीव वाचला होता. हा अपघात घडत असताना प्रत्यक्षदर्शी असलेल्या ठाणे येथील अथर्व बेडेकर तसेच राहुल मेश्राम यांनी शिवदुर्ग बचाव पथकाला फोन करून अपघाताची माहिती दिली. फोन येताच साहित्य आवराआवर करून व टिम जमा करून शिवदुर्गचे सदस्य चार वाजता लोणावळ्यातून निघाले. बचाव पथकात सामील झालेले दिव्येश मुनी, सचिन गायकवाड, ओंकार पडवळ, अभिजित बोरकर, रतन सिंग, राजेंद्र कडु, महेश मसने, यश चिकणे, यश सोनवणे, प्रिंस बैठा, हर्षल चौधरी, चंद्रकांत बोंबले, अनिल आंद्रे, प्रणय बढेकर मेहबूब मुजावर, सुनिल गायकवाड हे सर्व जण सायंकाळी पाच वाजता कोंडेश्वर मंदिर जवळ आणि पुढं सहा वाजता ते सर्व ढाक भैरव जवळ पोहोचले.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी मावळ माझा न्युज चा व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा

        रवींद्र जवळ पोचताच बचाव पथकातील सचिन गायकवाड, दिव्येश मुनी, ओंकार पडवळ, यश सोनावणे, महेश मसने, हर्षल चौधरी यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. दरम्यान त्याचे आई, वडील देखील त्याठिकाणी पोचले. बचाव पथकापुढे प्रश्न हा होता की जखमी रवींद्र याला कामशेतच्या दिशेने घेऊन जायचे की खाली कर्जतकडे सांडशी गावात उतरायचे. खाली जवळच आमची वाडी आहे त्यामुळे कामशेतकडे नेऊ नका अशी विनंती रवींद्रच्या आई वडीलांनी केल्याने बचाव पथकाने तशी तयारी केली. दोन पथक करून त्यातील एक पथक रविंद्रला घेऊन खाली सांडशी गावाकडे जाईल व दुसरे पथक साहित्य घेऊन वर कोंडेश्वर याठिकाणी उभ्या केलेल्या गाडीकडे जाऊन तेथून पुन्हा कर्जतकडे पहिल्या पथकाला घेण्यासाठी येईल असं नियोजन केले.

     संध्याकाळचे सात वाजता दोन्ही पथक निघाली. रवींद्र याला जखमी असल्याने स्ट्रेचरद्वारे खाली नेण्यात येत होते. अतितीव्र उतार आणि अवघड वाट असल्याने तसेच अंतरही खूप जास्त असल्याने बचाव पथकाच्या सदस्यांना प्रत्येक पाऊल जपून, सांभाळून टाकावं लागत होते. शिवदुर्गला माहिती देणाऱ्या अथर्व बेडेकर आणि त्याचे इतर साथीदार देखील मदत करीत होते. दरम्यान रवींद्र याच्या गावात ही खबर पोचल्यावर तेथील काही तरुण देखील मदतीला आले. अखेर खडतर मार्ग पार करून रात्री 10 वाजता हे बचाव पथक रवींद्र याला घेऊन सांडशी गावात दाखल झाले. त्याठिकाणी आधीच येऊन थांबलेल्या रुग्णवाहिकेमधून जखमी रवींद्र याला एम.जी.एम. रुग्णालयात हलविण्यात आले

इतर बातम्या