गणेशोत्सवापूर्वी लोणावळ्यातील खड्डे, कचरा व पथदिव्यांच्या समस्या सोडवा - लोणावळा शहर शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी
लोणावळा : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना लोणावळा शहरातील रस्त्यांवरील खड्डे, जागोजागी साचणारा कचरा आणि रस्त्यालगत बंद असलेले अथवा अपुरे पथदिवे या नागरिकांच्या दैनंदिन समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे आणि नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांना निवेदन दिले.
गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच भाविकांची वर्दळ वाढते. सार्वजनिक गणेश मंडळे, गणेशभक्त आणि नागरिकांची मोठी ये-जा होत असताना शहरातील रस्त्यांची दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि अस्वच्छतेच्या समस्येमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे उत्सव सुरू होण्यापूर्वीच शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यासोबतच शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित कचरा संकलन व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवून शहर स्वच्छ ठेवावे, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे. रस्त्यालगत असलेल्या पथदिव्यांचीही दुरुस्ती करून बंद असलेले दिवे तातडीने सुरू करावेत. गणेशोत्सवाच्या काळात रात्रीच्या वेळी नागरिकांची व भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यांवरील प्रकाशव्यवस्था सुरळीत असणे आवश्यक असल्याचे शिवसेनेने निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणावळा परिसरातील अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने संबंधित नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन पात्र नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
गणेशोत्सवापूर्वी शहरातील मूलभूत नागरी सुविधा सुरळीत करण्यासोबतच अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका शिवसेना लोणावळा शहराच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.
यावेळी शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख विशाल पाठारे, उपशहरप्रमुख विजय आखाडे, शहर सल्लागार पराग राणे, उपविभागप्रमुख नरेश घोलप, अमोल परदेशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

















