लोणावळ्यात 'चैतन्य पतसंस्थे'ची २६ वी वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना १५% लाभांश जाहीर
लोणावळा : चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सभेत संस्थेने सभासदांसाठी तब्बल १५ टक्के लाभांश जाहीर केला असून, तो तात्काळ सर्व सभासदांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
सभेच्या सुरुवातीला गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये सभासदांची दहावी व बारावीतील मुले तसेच लोणावळा परिसरातील दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला गुरुकुल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व विश्वस्त बापूलाल तारे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, नगरसेविका ॲड. रेशमाताई पाठारे, नगरसेविका लक्ष्मीताई पाळेकर आणि नगरसेविका आरतीताई तिकोने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह संस्थेचे संस्थापक मारुती साठे, अध्यक्ष जितेंद्र राऊत, उपाध्यक्ष कांताराम दळवी, संचालक मंडळ, तज्ज्ञ संचालक आणि सल्लागारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
गुणगौरव सोहळ्यानंतर संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे अधिकृत कामकाज सुरू झाले. सभेमध्ये विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली. याप्रसंगी संस्थेचे माजी संचालक, माजी सेवक आणि दैनंदिन बचत प्रतिनिधींचाही विशेष सन्मान करण्यात आला. अनेक सभासदांनी पतसंस्थेच्या पारदर्शक व प्रगतीपथावरील कारभाराचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
संस्थेची आर्थिक स्थिती : एकूण सभासद संख्या - ३,००९, वसूल भागभांडवल : ४,६८,००,५००, एकूण ठेवी : ५०,३५,२९,१८३, कर्जवाटप : ३६,११,११,३४६, स्वनिधी : ५,६८,३९,४८०, शुद्ध नफा : १,२६,२६,५१५
संस्थेचे संस्थापक मारुती साठे यांनी आपल्या मार्गदर्शनात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत सभासदांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष कांताराम दळवी यांनी केले. पसायदानाने सभेची सांगता झाली.

















