गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला शाडू माती पासून स्वतःच्या हाताने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याचा आनंद
लोणावळा : येथील विद्या विनय सभेच्या गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
शाडूच्या मातीपासून स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारून तीच मूर्ती घरी पूजनासाठी बसवण्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा, या संकल्पनेतून हा उपक्रम विद्या विनय सभेचे अध्यक्ष दिनेश राणावत यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात राबवण्यात आला.
शाळेचे कला शिक्षक महेश येवले यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून विविध आकारांच्या सुबक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत इयत्ता ७ वी ते १० वी मधील एकूण ५० विद्यार्थ्यांनी भाग घेऊन अत्यंत देखण्या आणि सुबक मूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या वतीने उत्तम मूर्ती बनवणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली.
या कार्यशाळेचे परीक्षण ज्येष्ठ कला शिक्षक, उत्कृष्ट रंगकर्मी व शिल्पकार चंद्रकांत जोशी यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्तीच्या विविध स्वरूपांची माहिती दिली. केवळ मूर्तीच्या आकारावर लक्ष न देता, मूर्तीच्या बारकाव्यांचा आणि स्वरूपाचा सखोल अभ्यास करून मूर्ती घडवावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुष्का कालगुडे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना पडवळ यांनी केले, तर उपस्थितांना पाहुण्यांचा परिचय तृप्ती निकम यांनी करून दिला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

















