लोणावळा नगरपरिषद लोणावळा शहर पोलीस स्टेशन व विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न
लोणावळा : भारतीय स्वातंत्र्याच्या 80 व्या स्वतंत्र दिनानिमित्त लोणावळा नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोर नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीसमोर ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ई-स्क्वेअर मॉल समोर शहराध्यक्ष रवी पोटफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा कार्यालयासमोर शहराध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ लोणावळा च्या वतीने शांति सदन शाळेमध्ये तर रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने कुसगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. नगरपरिषद शाळा तसेच खाजगी शाळांमध्ये देखील शाळांचे मुख्याध्यापक व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वतंत्र दिनाच्या निमित्त माजी सैनिक व वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. आणीबाणीच्या काळामध्ये ज्या नागरिकांनी तुरुंगवास भोगला अशा नागरिकांचा देखील सन्मान करण्यात आला. लोणावळा नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना सेफ्टी कीटचे वाटप करण्यात आले. मागील महिन्यामध्ये लोणावळा शहरांमध्ये निर्माण झालेल्या पुरा परिस्थितीमध्ये नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
ध्वजारोहण केल्यानंतर नागरिकांना संदेश देताना नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी लोणावळा शहराला स्वच्छ सुंदर व हरित ठेवण्याकरिता सर्वांनी सामूहिकरीत्या प्रयत्न करण्याची आव्हान केले. लोणावळा शहराला विकासाच्या उंचीवर घेऊन जात असताना प्रत्येकाचा सहभाग त्यामध्ये महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच लोणावळा शहराच्या पर्यटन विकासाला चालना देणारे विविध प्रकल्प शहरांमध्ये आणण्याबाबत त्यांनी विचार मांडले. सर्वच ठिकाणी विविध मान्यवर मोठ्या संख्येने या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. राजकीय पक्षांच्या वतीने ध्वजारोहण सोहळा झाल्यानंतर खाऊ वाटप देखील करण्यात आला.



















