खंडाळा अंधशाळेत लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळातर्फे ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
लोणावळा : लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्या वतीने खंडाळा येथील अंधशाळेत भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, राष्ट्रप्रेमाचा संदेश आणि सेवाभावी उपक्रम यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. यावेळी लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाचे अध्यक्ष लायन मंगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी अध्यक्ष लायन मंगेश कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी केलेले त्याग आणि बलिदान यांचे स्मरण करताना प्रत्येक नागरिकाने राष्ट्रप्रेमासोबतच समाजसेवेची जबाबदारीही जपली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. समाजातील गरजू घटकांना आधार देणे हीच खरी मानवसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अंधशाळेतील सर्व बांधवांसाठी लायन्स क्लबचे ॲक्टिव्हिटी चेअरमन लायन अमितभाई लुणावत यांनी प्रेमपूर्वक नाश्त्याची व्यवस्था केली. या सेवाभावी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करून आभार मानले. या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे सचिव लायन राजेश राजपूत, लायन हेमाश्रणी राजपूत, खजिनदार लायन रोहित थोरात, लायन मनिषा थोरात, लायन डॉ. दिलीप सुराणा, लायन डॉ. पोपट ओसवाल, लायन कांता ओसवाल, लायन ॲडव्होकेट प्रफुल्ल लुंकड, लायन अमित लुणावत, लायन दिप्ती लुणावत, लायन देवेंद्र नाळेकर, लायन निराळी नाळेकर, लायन स्नेहलता माळी आणि लायन अश्विनी कदम, अंध शाळेच्या व्यवस्थापिका नीलम शेख, अक्षय पाटील व कर्मचारी वर्ग आदी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी लायन ॲडव्होकेट प्रफुल्ल लुंकड यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व उपस्थितांचे, अंधशाळेतील बांधवांचे तसेच लायन्स क्लबच्या सदस्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. देशसेवा, समाजसेवा, मानवसेवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळाने स्वातंत्र्यदिनाचा हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला.



















