अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार; आरोपीला जन्मठेप; वडगाव मावळ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
लोणावळा : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात देहूरोड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी रमेश नारायण पवार (वय ६०) याला वडगाव मावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा निकाल दिला.
देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३१/२०२४ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२), ६५(१), ७४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८ आणि १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची स्पेशल केस क्रमांक ५/२०२५ अन्वये न्यायालयात सुनावणी झाली. खटल्यादरम्यान न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले पुरावे, कागदपत्रे तसेच साक्षीदारांच्या साक्षी तपासल्यानंतर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यानुसार बीएनएस कलम ६४(२)(f) अन्वये आरोपीला नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
तसेच बीएनएस कलम ६५(१) अन्वयेही आरोपीला नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दुगावकर यांनी केला. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील संतोष परदेशी आणि ॲड. लालचंद ओसवाल यांनी काम पाहिले. साक्षीदार तपासणीचे काम चौगुले मॅडम यांनी केले.
न्यायालयीन कामकाजात महिला पोलीस हवालदार ए. पी. घाटे आणि महिला पोलीस शिपाई पानसरे यांनी कोर्ट पैरवीची जबाबदारी पार पाडली. समन्स व वॉरंट अंमलबजावणीसाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सामील प्रकाश, पोलीस शिपाई धनगर (बकल क्रमांक २४७७) आणि पोलीस शिपाई वाकळे (बकल क्रमांक ३६०७) यांनी काम पाहिले.
पोलीस आयुक्त परिमंडळ ४च्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण बाळासाहेब मोरे आणि देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी व कोर्ट पैरवी पथकाने प्रभावीपणे काम करून न्यायालयासमोर भक्कम पुरावे सादर केले. त्यातून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यात पोलिसांना यश आले.

















