Breaking news

मळवली पाटण येथील अनाधिकृत बांधकामांवर PMDRA चा हातोडा; बांधकामे केली जमिनदोस्त

लोणावळा : मळवली पाटण भागात अनाधिकृतपणे टोलेजंग इमारती बांधत नैसर्गिक ओढे नाले यांचे प्रवाह अरुंद करणे, प्रवाह बदलणे असे प्रकार करणार्‍या बांधकामांवर आज PMRDA ने कारवाई करत सदरची बांधकामे जमिनदोस्त केली. मळवली पाटण भागातील नैसर्गिक ओढे नाले आडविल्यामुळे मागील वर्षी या भागात मोठ्या प्रमाणात पुर आला होता. मळवली भागातील हॅबेटेड येथील शेकडो घरे तसेच परिसरातील बंगले पाण्याखाली गेले होते. मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले होते तर अनेक नागरिकांना घरातून रेस्कू करत बाहेर काढण्यात आले होते. यानंतर स्थानिक नागरिक, एकविरा कृती समिती, शिवभक्त विजय तिकोणे यांनी सदरचा मुद्दा उचलून धरल्यानंतर मावळचे आमदार सुनिल शेळके, मावळचे तहसीलदार, प्रांत यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करत अनाधिकृत बांधकामे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेला एक वर्ष झाले तरी कारवाई होत नसल्याने एकविरा कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच विजय तिकोणे यांनी मागील पंधरवड्यात ह्या विषयावर आवाज उठवत भर पाण्यात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. यानंतर आज PMRDA ने जेसेबी, पाॅकलॅन, ब्रेकर अशी यंत्रे पाठवत सदरची कारवाई करत बांधकामे जमिनदोस्त केली. मावळ पंचायत समितीचे माजी सभापती दीपक हुलावळे, विजय तिकोणे, बाळासाहेब भानुसघरे, नंदकुमार पदमुले यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या