Breaking news

लोणावळ्यात 'वाय. सी. क्लासेस' तर्फे दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न!

लोणावळा : लोणावळा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या 'वाय. सी. क्लासेस'च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी, दि. ७ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजता लोणावळा नगरपालिकेच्या प्रियदर्शनी संकुल (लोणावळा गावठाण) येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

      यशाची परंपरा जपत वाय. सी. क्लास मागील कित्येक वर्षांपासून लोणावळा परिसरातील शाळांमधील इयत्ता दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करत आहे. याही वर्षी हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सदर कार्यक्रमाला लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. राजेंद्र सोनवणे, गुरुकुल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुष्का कालगुडे, माजी शिक्षण सभापती जितेंद्र कल्याणजी, 'एम एन न्यूज'चे संपादक ॲड. संजय पाटील, व्ही.पी.एस. लोणावळाचे उपमुख्याध्यापक श्री. विजय रसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. बबन धिडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच श्री. सहादू कालेकर, श्री. वसंत कालेकर, 'एम एन न्यूज'चे संपादक सुनील मस्के, 'मावळ वार्ता'चे पत्रकार गुरुनाथ नेमाने व श्री. कुमठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

        वाय. सी. क्लासेसने गेल्या २९ वर्षांपासून इयत्ता १० वी व १२ वी सायन्स, तसेच गेल्या १० वर्षांपासून १२ वी कॉमर्सचा १००% निकाल लावण्याची आपली देदीप्यमान परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर मिळवलेले यश थक्क करणारे आहे:

संकष्टी केदारी: हिंदी विषयात राज्यात २ री

आदर्श विश्वकर्मा: अकाउंट्स विषयात राज्यात ३ रा

श्रेया खांडेभराड: इकॉनॉमिक्स (अर्थशास्त्र) विषयात राज्यात ४ थी श्रुतिका जाधव: हिंदी विषयात राज्यात ६ वी, श्रेया जायगुडे: अकाउंट्स विषयात राज्यात ७ वी आली. या सर्व गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांकडून अथक परिश्रम करून घेणारे प्राध्यापक श्री. दीपेश गोणते, श्री. मयूर कनगुटकर व सौ. उजमा शेख मॅडम यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. आपल्या पाल्यांचा हा अभूतपूर्व सोहळा पाहून उपस्थित पालक भारावून गेले होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वाय. सी. क्लासेसचे संचालक श्री. निवृत्ती दुडे यांनी क्लासच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या काळात विद्यार्थी आणि पालकांसमोर असलेली आव्हाने अधोरेखित करताना ते म्हणाले, "आजचा काळ हा कमालीच्या संघर्षाचा आहे. विद्यार्थ्यांनी खचून न जाता या संघर्षाला आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे." या प्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना भावी काळातील आव्हाने कशी पार पाडावीत, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

सांस्कृतिक रंग आणि नेटके नियोजन

कार्यक्रमाची सुरुवात कु. स्वाती कुटे व पायल हमरे यांच्या सुमधुर स्वागतगीताने झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन क्लासेसच्या विद्यार्थिनी कु. भूमिका जाट व सृष्टी खिरीड यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

        हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रा. श्री. दीपेश गोणते सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मयूर सर, सौ. मालती दुडे व सौ. स्वाती गोणते यांनी विशेष परिश्रम घेतले. १२ वी सायन्स व कॉमर्सच्या सर्व विद्यार्थिनींनी कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे आभार कु. प्रगती लंके हिने मानले.

इतर बातम्या