Lonavala Rotary Club l ॲड. मोनाली कुलकर्णी यांची स्वीकारला रोटरी क्लब ऑफ लोणावळा चा पदाभार
'रोटरी' म्हणजे केवळ पद नव्हे, तर 'सेल्फ अबव्ह सर्व्हिस'चे व्रत - गव्हर्नर नितीन ढमाले
लोणावळा : रोटरी क्लबमध्ये सदस्य होणे म्हणजे केवळ एक पद भूषवणे नसून, आपल्या स्वतःच्या गरजांच्या पलीकडे जाऊन समाजाचे देणे लागते ही भावना जोपासणे होय. रोटरी हे 'सर्व्हिस अबव्ह सेल्फ' (स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ) या तत्त्वावर आधारित कार्य करणारी संघटना आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर नितीन ढमाले यांनी केले. लोणावळा रोटरी क्लबच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी रोटरीच्या ध्येयधोरणांवर प्रकाश टाकत आगामी काळातील उपक्रमांची दिशा स्पष्ट केली. यावेळी व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीन ढमाले यांच्यासह रोटरी इंटरनॅशनल चे अध्यक्ष ओलायीनका बाबालोला, रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या माजी अध्यक्षा विजया कल्याण, सेक्रेटरी मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर, विद्यमान अध्यक्ष ॲड. मोनाली कुलकर्णी, सेक्रेटरी डाॅली अगरवाल हे उपस्थित होते.
५५ वर्षांचा गौरवशाली वारसा
लोणावळा रोटरी क्लबच्या ५५ वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करत गव्हर्नर ढमाले म्हणाले की, हा क्लब अत्यंत सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे. समाजातील सुस्थितीत असणाऱ्या रोटेरियन्सनी आजही मूलभूत गरजांपासून वंचित असणाऱ्या घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणे ही काळाची गरज आहे.
मावळात राबवणार 'संजीवनी' ड्रीम प्रोजेक्ट
यावेळी गव्हर्नर ढमाले यांनी मावळ तालुक्यासाठी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. 'संजीवनी' या ड्रीम प्रोजेक्टच्या माध्यमातून ५००० पेक्षा जास्त रुग्णांना मोफत उपचार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, जागतिक दर्जाचे प्रकल्प हाती घेण्यासाठी 'ग्लोबल ग्रँटस' (Global Grants) राबवले जाणार आहेत. या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नर यांनी स्वतःच्या वतीने २०० डॉलर 'डीडीएफ' (DDF) देण्याचे जाहीर केले.
अनेकविध सामाजिक उपक्रमांचे उद्दिष्ट
आगामी वर्षाच्या नियोजनावर बोलताना त्यांनी खालील महत्त्वाची उद्दिष्टे मांडली:
सदस्यत्व वाढ : संघटनेच्या विस्तारासाठी सदस्यत्व वाढीवर विशेष भर दिला जाणार आहे.
आवास योजना : जिल्ह्यामध्ये ४०० पेक्षा जास्त घरे बांधण्याचे उद्दिष्ट.
पर्यावरण संवर्धन : १०० पेक्षा जास्त बायोगॅस युनिट्स उभारण्याचे लक्ष्य.
स्वयंसेवेसोबतच परिवारासाठी वेळ द्या
समाजासाठी निस्वार्थपणे काम करताना स्वतःच्या आरोग्याची आणि परिवाराची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे सांगत गव्हर्नर ढमाले यांनी रोटेरियन्सना एक भावनिक आवाहन केले. त्यांनी सांगितले की, "समाजाच्या कार्यात मग्न असताना, महिन्यातील दोन दिवस स्वतःसाठी आणि आपल्या रोटरी परिवारासाठी नक्की द्यावेत."
या सोहळ्यामुळे लोणावळा रोटरी क्लबच्या सदस्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून, आगामी वर्षातील सामाजिक कार्यासाठी नवी प्रेरणा मिळाली असल्याची भावना यावेळी लोणावळा रोटरी क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब परिवारामध्ये नव्याने सहभागी झालेल्या सदस्यांचा पदग्रहण सोहळा देखील यावेळी पार पडला.
यावेळी बोलताना रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्ष ॲड. मोनाली कुलकर्णी यांनी वर्षभरामध्ये समाज हिताचे विविध सामाजिक उपक्रम राबवत रोटरी क्लब ऑफ लोणावळ्याचे नाव हे कामाच्या माध्यमातून उज्वल करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन रवींद्र कुलकर्णी व नितीन कल्याण यांनी केले.






















