Lonavala News l लोणावळ्यात अतिक्रमण कारवाईचा जोर ओसरला; कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा टपऱ्या
लोणावळा : लोणावळा शहरात रहदारीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांच्या अतिक्रमणावर लोणावळा नगरपरिषदेने मागील आठवड्यात दोन ते तीन दिवस सलग कारवाई करत अनेक टपऱ्या व रस्त्यावर आलेली अतिक्रमणे काढली होती. या कारवाईचा जोर ओसरतात कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा टपऱ्या लागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कुमार रिसॉर्टच्या समोरील नगर परिषदेच्या पार्किंग मध्ये नव्याने काही टपऱ्या संध्याकाळच्या वेळेत लागण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वलवण ते खंडाळा दरम्यान मोठ्या प्रमाणात फळ विक्रेत्यांची गर्दी झाली आहे. दोनच दिवसापूर्वी अशाच एका फळ विक्रेत्याच्या दुकानासमोर थांबलेल्या एका आलिशान गाडीचा दुसऱ्या गाडीने धडक दिल्याने मोठा अपघात झाला होता.
लोणावळा शहरामध्ये प्रशासनाचा वचक राहिला नसल्यामुळे मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये टपऱ्या, हात गाड्या व पथारी व्यावसायिक यांची गर्दी झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील हे व्यवसायिक असले तरी त्यांच्यामुळे शहरातील इतर सर्वसामान्य नागरिकांना देखील रस्त्यावरून चालणे हे अवघड बनले असून वाहने लावण्यास लोणावळा बाजारपेठेमध्ये कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाही. लोणावळा नगरपरिषदेने बाजार भागामध्ये कारवाई केली या कारवाई वेळी अतिक्रमण केलेल्या एका महिला व्यवसायिकांनी नगर परिषदेच्या मुकादामाला धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना देखील सध्या लोणावळा शहरांमध्ये चर्चेत आहे. मात्र या प्रकरणी सदर मुकादमा कडून अथवा नगरपरिषदेकडून कोणतेही कारवाई झालेली नाही. या घटनेनंतर लोणावळा शहरातील अतिक्रमण कारवाई ही बंद झाली असून पुन्हा कारवाई केलेल्या ठिकाणी अतिक्रमणे होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रस्त्यावर आलेल्या ज्या अतिक्रमणांवर नगरपरिषदेने कारवाई करत ती मागे सरकवली होती ती दुकाने देखील पुन्हा रस्त्याकडे येऊ लागली आहेत.
कारवाई मध्ये सातत्य नसणे व प्रशासनाचा लोणावळा शहरामध्ये कमी झालेला वचक या कारणामुळे लोणावळा शहर हे बकाल होऊ लागले आहे. बाजारभाव असू अथवा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाचा परिसर या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अतिक्रमणे वाढली आहेत. तर काही ठिकाणी बांधकामे करताना ती नगर परिषदेच्या मंजूर आराखड्याप्रमाणे न करता रस्ते व शासकीय जागांवर मनमानीपणाने होऊ लागली आहेत. लोणावळा शहरातील रस्त्यांच्या कडेला होत असलेल्या लहान-मोठ्या व्यवसायिक अतिक्रमणांचा मुद्दा वारंवार आढावा बैठकींमध्ये चर्चिला जातो मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करून केवळ सोपस्कार पूर्ण केले जातात व ही कारवाई झाल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या याप्रमाणे दुकाने थाटली जात आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे लोणावळा शहरांमधील नागरिकांवर कळत नकळत अन्याय होत असल्याची भावना सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.






















