Lonavala News l महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी ॲड. रंजना भोसले यांची निवड; लोणावळ्यात जल्लोषात स्वागत
लोणावळा : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या (Maharashtra & Goa Bar Council) नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मावळ तालुक्याच्या कन्या ॲड. रंजनाताई भोसले यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या विजयासोबतच त्यांनी बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदावर निवड होण्याचा बहुमान मिळविला आहे. बार कौन्सिलवर मावळ तालुक्यातून प्रथमच प्रतिनिधित्व मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण असून, लोणावळ्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
लोणावळ्यात आगमन होताच शहरातील मुख्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ॲड. रंजनाताई भोसले यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या समर्थकांनी आणि कायदेतज्ज्ञांनी गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणाबाजी करून या विजयाचा जल्लोष साजरा केला.
या स्वागत सोहळ्याला विधिज्ञ क्षेत्रातून ॲड. प्रफुल लुंकड, ॲड. दीपक चौधरी, ॲड. धनंजय कोडरे, ॲड. राजेश ओसवाल, ॲड. प्रफुल सोनावणे, ॲड. मोनाली कुलकर्णी, ॲड. आकाश सोनावणे, ॲड. संजय गायकवाड उपस्थित होते. तसेच व्यापारी वर्गाकडून राजू खंडेलवाल, अमित चोरडिया, निलेश गुप्ता यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि त्यांचे हितचिंतक उपस्थित होते.
ॲड. रंजनाताई भोसले यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून आपल्या कारकीर्दीत अतिशय प्रभावी कामगिरी बजावली आहे. सामाजिक आणि कायदेशीर क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाचाच हा विजय असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात असून, मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.






















