Breaking news

मोठी बातमी l मावळातील त्या आठ बड्या नेत्यांवर सहा वर्षासाठी पक्षातून निलंबनाची कारवाई

वडगाव मावळ : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी भूमिका घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उघडपणे प्रचार करणाऱ्या मावळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील आठ मोठ्या नेत्यांवर सहा वर्षासाठी पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचा आदेश डावलने, पक्ष शिस्तीचा भंग करणे आदी कारणे देत ही कारवाई करण्यात आली आहे.

      मावळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली होती. पक्षाचे ते अधिकृत उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेतेमंडळींनी उघडपणे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात भूमिका घेत विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले. पक्षाने त्यांना दिलेला आदेश त्यांनी डावलला पक्ष शिस्तीचा भंग केला, या पक्षविरोधी कृती केल्याचा जाब त्यांना विचारला असता त्यांनी थेट राजीनामे पक्ष श्रेष्ठींकडे सादर केले. त्यांनी दिलेले राजीनामे पक्ष श्रेष्ठींनी स्वीकारले असून त्यांच्यावर पक्ष शिस्तभंग केला म्हणून सहा वर्ष पक्षातून निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

यापुढील काळात या आठही जणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध असणार नाही असे देखील यात म्हटले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, युवक जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, अंकुश आंबेकर, शिवाजी आसवले, संतोष भेगडे, संतोष मुऱ्हे, नामदेव शेलार अशी कारवाई झालेल्या नेते मंडळींची नावे आहेत.

इतर बातम्या