Breaking news

Maval Loksabha Election : मावळ लोकसभेसाठी पहिल्याच दिवशी 27 व्यक्तींनी नेले 49 उमेदवारी अर्ज

लोणावळा : 33 - मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज पासून उमेदवारी अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 27 व्यक्तींनी 49 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे येत्या 13 मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभेच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांसोबत अन्य उमेदवारांची देखील मोठी मांदियाळी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2019 साली सुद्धा मावळ लोकसभेसाठी तब्बल 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. 

       लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराची सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने माजी महापौर संजोग वाघेरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मागील दीड ते दोन महिन्यापासून त्यांचा मतदारसंघांमध्ये प्रचार सुरू आहे. मतदार संघामधील विविध पक्षांचे प्रमुख नेतेमंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटी, आढावा बैठका, मेळावे सातत्याने सुरू आहेत. गाव बैठका व घोंगडे बैठकांच्या माध्यमातून तसेच विविध सण व उत्सवाच्या निमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांना भेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. व त्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघांमधील मागील दहा वर्षापासून रखडलेली विकास कामे व नागरिकांच्या समस्या या देखील जाणून घेतल्या आहेत. महायुतीच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे पक्षाचे व मावळचे दोन वेळचे खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी देखील मतदारसंघांमधील काही प्रमुख नेतेमंडळींच्या भेटी घेतल्या आहेत. मागील दोन वेळचे खासदार असल्याने मतदार संघामध्ये त्यांचा संपर्क राहिलेला आहे. येणारी लोकसभेची निवडणूक ही प्रामुख्याने महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्येच तुल्लबळ होणार असली तरी मातब्बर अपक्ष उमेदवार किंवा वंचित आघाडी कडून एखादा तगडा उमेदवार मिळाल्यास महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांवर निश्चितच फरक पडणार आहे.

    25 एप्रिल पर्यंत मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 26 एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात येणार असून 29 एप्रिल पर्यंत नामनिर्देशन अर्ज माघारी घेता येणार आहेत. तर 13 मे रोजी मावळ लोकसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.    



इतर बातम्या

महागाई व बेरोजगारीने त्रस्त झालेले सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करणार नाही याची खात्री पटल्याने भाजपाने राज्यात सर्वत्र फोडाफोडीचे राजकारण केले - निखिल कवीश्वर