Breaking news

सौभाग्यवती मावळ 2023 । आदेश भाऊजींच्या हास्यविनोदाने लाजर्‍या वहिनी झाल्या बोलक्या…

तळेगाव दाभाडे : कुलस्वामिनी महिला मंच व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित व आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडीयेला अर्थात सौभाग्यवती मावळ 2023 या कार्यक्रमास महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. स्त्री शक्तीचा जागर करत या कार्यक्रमात उखाणे, विनोद, प्रश्नोत्तरे, नृत्य अशा सर्वच स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सर्वच वयोगटातील महिलांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. आदेश बांदेकर यांनी थेट प्रेक्षकांमध्ये जात लाजऱ्या वहिनींना बोलके करत गप्पांमधून त्यांची सुखदुःखे जाणून घेतली. मनोरंजनात्मक खेळ खेळून विजेत्यांना बक्षिसे आणि मानाची पैठणी दिली आणि त्याचबरोबर जाता जाता स्त्री शक्तीची जाणीव करुन दिली. यामुळे कार्यक्रम आणखी रंगतदार झाला.

      पहिला क्रमांक असलेल्या दुचाकी व मानाच्या पैठणीच्या मानकरी मनीषा भुषण वाणी ठरल्या. तर दुसरा क्रमांक एक तोळा सोन्याचे नाणे विजेत्या भावना गवारे, सात ग्रॅम सोन्याचे नाणे तिसरा क्रमांक विजेत्या पल्लवी हातुरे, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे चौथा क्रमांक जागृती कडू, तीन ग्रॅम सोन्याचे नाणे पाचवा क्रमांक चैत्राली पिंगळे ठरल्या. तर लकी ड्रॉद्वारे काढण्यात आलेल्या अर्धा तोळे सोन्याचे विजेत्या शारदा शिंदे, रेफ्रिजरेटर विजेत्या सुगंधा ठाकरे, वॉशिंग मशीन विजेत्या सुरेखा कारके, टीव्ही विजेत्या मनीषा बांदल, घरगुती आटा चक्की विजेत्या चंद्रकला जठार, मायक्रोवेव्ह ओव्हन विजेत्या मंगल पालवे, मोबाईल फोन विजेत्या सुरेखा पवार, फूड प्रोसेसर विजेत्या सीमा काळे, कुलर विजेता प्रियंका शेटे आणि गॅस शेगडी विजेत्या रुपाली शिंदे ठरल्या. राष्ट्रवादी काँग्रेस व कुलस्वामिनी महिला मंच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले होते.

सारिका शेळके, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्ष :- प्रत्येक स्त्री संसाराच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलताना तिच्या कलागुणांना वाव मिळत नाही. समाजात महिलांना समानतेची वागणूक तसेच मानसन्मान मिळायला हवा. या कार्यक्रमामुळे महिलांना सर्व सुखदुःखे विसरुन दिलखुलास आनंद घेता आला याचे समाधान आहे. 

शैलजा काळोखे राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष :- शहरात पहिल्यांदाच इतका मोठा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला. महिला नेहमीच कुटुंबातील कामांमध्ये व्यस्त असतात. या कार्यक्रमामुळे महिलांना मनसोक्त वावरण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले.

इतर बातम्या