9 ऑगस्ट क्रांतिदिन l पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील हुतात्म्यांना शिवसेना मावळ परिवाराच्या वतीने अभिवादन; ‘हुतात्मे अमर रहे’ च्या घोषणांनी दुमदुमला महामार्ग
लोणावळा : पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनात प्राणांची आहुती देणारे पवना नगर येथील शेतकरी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांना शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने नेहमीप्रमाणे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमात शिस्तबद्ध व भावूक वातावरणात हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसैनिक, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी हुतात्म्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील त्यांच्या त्यागाचे स्मरण केले. पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड शहरासाठी बंदिस्त जलवाहिनीद्वारे नेण्याच्या प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. या आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून दरवर्षी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला जातो. या आंदोलनाला यावर्षी 15 वर्ष पूर्ण झाली.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुऱ्हे, विभागप्रमुख सदानंद भोसले, माजी विभागप्रमुख सुनील इंगुळकर, वाहतूक सेना पुणे तालुकाध्यक्ष अवधूत चव्हाण, वाहतूक सेना तालुका संघटक सतीश गरुड यांच्यासह दिनेश वीर, माजी उपतालुका प्रमुख कैलास सगळे, माजी सरपंच अनिल भालेराव, पवन मावळ विभागप्रमुख सुरेश गुप्ता, कार्यालय प्रमुख सनी मोहिते, शाखाप्रमुख उमेश ठाकर, दत्ताभाऊ दाभाडे, विभाग संघटक अंकुश वाघमारे, लहू जाधव, सदानंद पिल्लाने, युवा सेनेचे सतीश गोनते यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान हुतात्म्यांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनात आपल्या हक्कांसाठी लढताना हुतात्म्यांनी दिलेले बलिदान सदैव स्मरणात राहील, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘हुतात्मे अमर राहो’ अशा घोषणा देत कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि शामराव तुपे यांच्या बलिदानाला सलाम केला.



















