पवना प्रकल्पातील शहीद शेतकऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाची मानवंदना; ‘पाणी पळविण्याचा प्रयत्न झाल्यास प्रथम शिवसेना रोखणार’
लोणावळा : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनादरम्यान ९ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. शहीद स्मृतीस्थळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून शहीद शेतकऱ्यांना अभिवादन केले.
यावेळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पवना पाणीप्रश्नावर शिवसेनेने आपली भूमिका ठामपणे मांडत प्रशासनाला इशारा दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार तसेच मावळ शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या विचारांसोबत असून, शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात आघाडीने पुढाकार घेत आहे. कालही, आजही आणि उद्याही शेतकऱ्यांची भूमिका ठामपणे मांडत राहू,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळण्यास शिवसेनेचा विरोध नाही; मात्र हे पाणी नदी-पाटाच्या माध्यमातूनच मिळावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
पिंपरी-चिंचवडकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्याची भूमिका नसून, सर्वसमावेशक पद्धतीने पाणीवाटप झाले पाहिजे आणि मावळातील शेतकरी व नागरिकांवर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका ठोंबरे यांनी स्पष्ट केली.
मावळच्या जनतेच्या हक्काच्या पाण्यावर कोणत्याही प्रकारे गदा आणली जाऊ नये, यासाठी शिवसेना ठामपणे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात कोणत्याही हुकूमशाही पद्धतीने बळजबरीने मावळचे पाणी पळविण्याचा प्रयत्न झाल्यास ‘तो प्रयत्न सर्वप्रथम शिवसेना रोखेल,’ असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या आंदोलनात ९ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या गोळीबारात शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या शहीद शेतकऱ्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून त्यांच्या हक्कासाठी आणि मावळच्या पाणीप्रश्नासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, जिल्हा समन्वयक शांताराम भोते, उपतालुकाप्रमुख युवराज सुतार, विभागप्रमुख संदीप झांबरे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत भोते, वाहतूक तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेलार, काँग्रेस अध्यक्ष यशवंत मोहोळ, काँग्रेस सरचिटणीस दिलीप ढमाले, आरपीआय मावळ तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, उपविभागप्रमुख संजय विकारी, शंकर दळवी, शिवसेना प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.



















