लोणावळा नगर परिषदेने 31 जानेवारी पर्यंत ती अतिक्रमणे काढावीत अन्यथा मी चौकात टपरी टाकणार; आमदार सुनील शेळके यांनी कडक शब्दात सुनावले

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये नगर परिषदेच्या जागेवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. लोणावळ्यात जागा उपलब्ध दिसेल त्या ठिकाणी टपऱ्या लावल्या जात आहेत. कोणाच्या मेहेरबानीने या टपऱ्या व अतिक्रमणे होत आहेत. ती होत असताना प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही, कोणाच्या मेहरबानीने या जागा गिळंकृत होत आहेत. लोणावळा नगर परिषदेने 31 जानेवारीपर्यंत ती अतिक्रमणे काढून टाकावीत अन्यथा एक फेब्रुवारी रोजी लोणावळा नगर परिषदेसमोर भर चौकात टपरी टाकून प्रशासनाचा निषेध नोंदवू असा सज्जड दम मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे. आमदार शेळके म्हणाले, काही लोकांनी टपऱ्या हा धंदा केला आहे. हप्ते वसुली केली जात आहे, महिन्याचे तसेच दिवसाचे भाडे वसूल केले जात आहे अशी माहिती मला प्राप्त झाली आहे. शहराला बकाल करण्याचा विडाच येथे काही लोकांनी उचलला असल्याचे दिसून येत आहे.
लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या बाजूने व शासकीय मोकळ्या जागांवर अतिक्रमणे तसेच टपऱ्या उभ्या राहत आहेत. यामुळे लोणावळा शहराला एक बकालपणा निर्माण झाला आहे. पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या काही टपरीधारकांसाठी फेरीवाला धोरण अंतर्गत जागा देण्याबाबतचा निर्णय झाला आहे. त्यांचे पुनर्वसन होत असताना मागील काही दिवसांमध्ये नव्याने मोठ्या प्रमाणात लोणावळा शहरामध्ये टपऱ्या व हातगाड्या लागत आहेत. नगर परिषदेच्या मोकळ्या जागांवर देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होऊ लागली आहेत. लोणावळा शहरामध्ये ही अतिक्रमणे व टपऱ्या कोणाच्या मेहरबानीमुळे होत आहेत, असा थेट प्रश्न आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला.
ही अतिक्रमणे होत असताना लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून त्यावर त्या त्या वेळेसच कारवाई का केली जात नाही. येत्या 31 जानेवारीपर्यंत या अतिक्रमणांवर कारवाई करत त्या जागा मोकळ्या कराव्यात अन्यथा एक फेब्रुवारी रोजी लोणावळा नगरपरिषद इमारतीसमोर चौकात टपरी लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला जाईल अशा शब्दात आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनाला सुनावले आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने अतिक्रमण कारवाई सुरू असल्याचा खुलासा यावेळी प्रशासनाकडून मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केला. मात्र ही कारवाई झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमणे उभी राहत आहेत. कारवाई मध्ये सातत्य नसल्याने अथवा ती कारवाई लुटुपुटू ची होत असल्याने कारवाईनंतर परिस्थिती जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.