Breaking news

लोणावळा नगरपरिषद व एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार लोणावळ्यातील पूरग्रस्त नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी सुरू

लोणावळा : नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोणावळा नगरपरिषद आणि एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्रीनगर (हुडको) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले.

        मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू, धान्य, अन्नसाहित्य आणि घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी चिखल, कचरा आणि राडारोडा साचल्याने दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम सुरू असली तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले.

         मावळचे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील हुडको कॉलनी, सह्याद्रीनगर, कैलासनगर, म्हाडा कॉलनी, इंदिरानगर, टेबल लँड परिसर आदी पूरग्रस्त भागांमध्ये आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि औषधांचे वितरण करण्यात येत आहे. त्याची सुरुवात सह्याद्रीनगर (हुडको) येथून करण्यात आली. येथे 113 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

      या शिबिरात डॉ. मृण्मयी तावरे आणि डॉ. अभय कामत यांच्या पुढाकाराने डॉ. गोपीचंद जाधव, डॉ. मयूर वाले, डॉ. रोहन निमडे, डॉ. प्रवीण लाड, डॉ. करिष्मा तसेच परिचारिका शुभांगी भांगरे, आरती मानकर, श्वेता पाठारे, पल्लवी तिघे, नेहा दळवी, अश्विनी शिंदे आणि हेमा पाठक यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली.

       यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, नगरसेवक सनी दळवी, सनी घोणे, मुकेश परमार, नगरसेविका दीपा अग्रवाल, निखिल तिकोने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष अंश घोणे, विजय इंगुळकर, जयप्रकाश परदेशी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी नगरसेवक झाकीर खलिफा यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली. पूरानंतर नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारची आरोग्य शिबिरे अत्यंत उपयुक्त ठरत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बाकी ठिकाणी देखील ही शिबिरे घेतली जाणार आहेत.

इतर बातम्या