लोणावळ्यात अतिवृष्टीचा हाहाकार; नगरसेवक मोबीन इनामदार यांनी जीव धोक्यात घालून वाचविले अनेक जीव
लोणावळा : ६ जुलै रोजी लोणावळा शहरात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. हुडको आणि इंद्रायणी नगर परिसरातील ओढ्याला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. पाणी वेगाने वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.
अशा कठीण प्रसंगी, लोणावळ्याचे जनसेवक नगरसेवक मोबीन इनामदार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अनेक नागरिक भीतीपोटी आपल्या घराबाहेर पडण्यास तयार नव्हते, अशा वेळी इनामदार यांनी संयम राखत त्यांची समजूत काढली आणि त्यांना सुरक्षितपणे घराबाहेर काढले.
विशेष म्हणजे, या बचाव कार्यादरम्यान त्यांनी एका १५ दिवसांच्या नवजात बालकाला आपल्या मांडीवर घेऊन, जीव धोक्यात घालून सुरक्षित स्थळी हलवले. गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पूरग्रस्त नागरिकांना 1 लाख रुपयांची तातडीची शासकीय मदत मिळावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
पूरग्रस्तांना फूड पॅकेट्स वाटप
हुडको व इंद्रायणी नगर भागामध्ये पुराचे पाणी भरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नागरिकांना नगरसेवक मोबीन इनामदार यांच्या माध्यमातून जेवणाचे फूड पॅकेट्स वाटप करण्यात आले.






















