Breaking news

जगतगुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान वाकसई या ठिकाणी तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

लोणावळा : जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे विसाव्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाकसई येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान या ठिकाणी आज तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील 28 वर्षांपासून तुकाराम बीज सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते उद्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

     आज जगतगुरु जगत वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्याच्या निमित्ताने तुकाराम झाड पादुका स्थान या ठिकाणी हभप सुभाष महाराज गेठे आळंदी देवाची यांची कीर्तन रुपी सेवा पार पडली. महाराजांनी तुकाराम गाथेमधील ओव्यांचा आधार घेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. तसेच तुकाराम महाराज यांचा संदेह वैकुंठ गमन सोहळा याविषयी विस्तृतपणाने माहिती दिली. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्याच्या निमित्ताने आपण देखील काहीतरी आदर्श घ्यावा अशा प्रकारची विनंती वजा सूचना त्यांनी उपस्थितांना केली. वसई पंचक्रोशी मधील भाविक भक्त मोठ्या संख्येने या कीर्तन सोहळ्यासाठी उपस्थित होते. दुपारी बारा वाजता फुलांची उधळण करत तुकाराम बीज साजरी करण्यात आली. यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान सेवा ट्रस्ट यांच्यावतीने अनेक मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हभप. नामदेव महाराज बोरडे गेवराई यांच्या काल्याच्या कीर्तनाने उद्या या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.


इतर बातम्या